प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनामुळे बंद ठेवण्यात आलेल्या राज्यातील शालेय क्रीडा सुरू करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार सकारात्मक आहे. लवकरच स्पर्धा सुरू होतील, त्यासाठी क्रीडामंत्रालयाच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती, राज्याच्या क्रीडाराज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
मंत्री तटकरे खासगी कार्यक्रमानिमित्त दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱयावर आल्या होत्या. मंगळवारी कोल्हापूर शहर राष्ट्रवादी क्रीडा सेलचे अध्यक्ष सुहास साळोखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. साळोखे यांनी खेळाडूंच्या व्यथा मांडल्या. गेली पावणे दोन वर्षे शालेय क्रीडा स्पर्धा कोरोनामुळे बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचा फटका खेळाडूंना मोठÎा प्रमाणावर बसला आहे. त्याचे शारीरिक, मानसिक स्वास्थ बिघडले आहे. नुकत्याच झालेल्या टोकिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून निराशा झाली. त्यामुळे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या क्रीडा धोरणात अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे.
त्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घ्यावा, तसेच आगामी ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा व इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून क्रीडा धोरण तयार करावे, खेळाडूंना मदत आणि सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी सुहास साळोखे यांनी केली. त्यावर मंत्री तटकरे यांनी शालेय क्रीडा स्पर्धा सुरू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. त्या दृष्टीने अभ्यास आणि नियोजन सुरू आहे. लवकरच स्पर्धा सुरू होतील. खेळाडू तयार करण्याच्या कार्यात सरकार सर्वोतोपरी मदत करेल, अशी ग्वाही दिली. यावेळी राजर्षी शाहू गव्हमेंट सर्व्हट बँकेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक रविंद्र पंदारे, प्रदेश प्रतिनिधी संजय कुराडे, संजय पडवळे, सुनील काटकर, अभिजित शिंदे, उत्कर्ष बचाटे आदी. मान्यवर उपस्थित होते.








