प्रतिनिधी /बेळगाव
योग साधना किंवा योगाचा सराव हा आरोग्यासाठी आवश्यक आहे. याचे महत्व सर्वांनाच पटले आहे. त्यामुळेच शारदोत्सव महिला सोसायटीने ‘संगीतासवे योग’ (शारीरिक स्पर्धा) जाहीर केली. शुक्रवारी सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात ही स्पर्धा उत्साहात पार पडली. विशेष म्हणजे या स्पर्धेला महिलांचा लक्षणीय प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेच्या निमित्ताने महिलांनी योगाचा सरावही केला. सदर स्पर्धा 55 वरील वयोगट, 25 ते 40 वयोगट आणि 41 ते 55 वयोगटात झाली. सर्वच गटातील महिलांनी विशेष परिश्रम घेतल्याचे सादरीकरणावेळी जाणवले. यासाठी प्रत्येक सहभागी संघाने वैविध्यपूर्ण पोषाखही केला होता.
एकदंताय वक्रतुंडाय, ए गिरी नंदिनी, विठ्ठला यासह अनेक गीतांच्या पार्श्वभूमीवर महिलांनी योगाचे प्रात्यक्षिक सादर केले आणि आपले कौशल्य सिध्द केले. यानिमित्ताने त्यांनी काही थरारक सादीकरणही करुन टाळय़ा मिळविल्या. सकाळी शारदोत्सवाच्या अध्यक्षा माधुरी शानभाग व कार्यकारिणीच्या हस्ते गणेश पूजन व नटराज पूजन करुन स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. स्पर्धेसाठी सभागृह उपलब्ध करुन दिल्याबद्दल वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरुपा इनामदार यांचा सत्कार करण्यात आला.









