प्रतिनिधी /बेळगाव
शक्ती, भक्ती यांचे प्रतीक मानले गेलेल्या देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. शहर परिसरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे. दोन वर्षांपासून सण आणि उत्सवांवर कोरोनाने मर्यादा आणल्या. यंदा मात्र कोरोना काही अंशी नियंत्रणात आला आहे. अर्थात तो पूर्णपणे हद्दपार झाला नसल्याने नवरात्रोत्सव साजरा करताना कोविड-19 च्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
पक्षपंधरवडय़ामध्ये महिलांनी घरातील डबे, भांडी घासून पुसून स्वच्छ केली. अंथरुण-पांघरुण धुतले तरी यंदा पावसाने मात्र ते वाळण्यासाठी अडथळा निर्माण केला. घरोघरी गेले पंधरा दिवस स्वच्छता मोहीमच सुरू होती. दहा दिवस घरांमध्येही देवीची आराधना आणि जागर होईल.
शहरातील सर्व देवी मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण होत आली आहे. मंदिरांची रंगरंगोटी आणि स्वच्छता करण्यात आली असून आता दहा दिवस देवीचा जागर होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत. सर्व मंदिरांमध्ये गुरुवारी घटस्थापना होईल. त्यानंतर ललिता पंचमी, दुर्गाष्टमी, खंडेनवमी, विजयादशमीनिमित्त विशेष पूजा होणार आहेत.
बेळगावकर महिलांचा लाडका शारदोत्सवसुद्धा यंदा साजरा होणार आहे. त्यामुळे महिलावर्ग सुखावला आहे. यंदा लोकमान्य रंगमंदिर येथे हा उत्सव होत असून गुरुवार दि. 7 रोजी दुपारी 3.30 वाजता प्राची जावडेकर यांच्या हस्ते शारदोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सोमवार दि. 11 पर्यंत होणाऱया या उत्सवात व्याख्यानांच्या बरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत.
बेळगावच्या तरुणाईचा उल्लेखनीय सहभाग असणारी दुर्गामाता दौडसुद्धा यंदा होणार आहे. मात्र, दौडमधील तरुणाईचा सहभाग मर्यादित करण्यात आला आहे. फक्त 15 जणांचा दौडमध्ये सहभाग असणार आहे. गुरुवार दि. 7 ते शुक्रवार दि. 15 या कालावधीत दौड निघणार असून धारकऱयांची नावे विभाग प्रमुखांतर्फे कळविण्यात येणार आहेत. दौडमधील सहभाग मर्यादित करण्यात आल्याने तरुणाई नाराज झाली आहे. तथापि, धारकऱयांनी गल्लीतील मंदिरांमध्ये एकत्र येऊन शिवचरित्राचे पारायण करावे, असे आवाहन किरण गावडे यांनी केले आहे.









