- शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टचा पुढाकार
ऑनलाईन टीम / पुणे :
गणेशोत्सवासह विविध कार्यक्रमात शांताबाई या गाण्यावर लाखो नागरिक थिरकतात. मात्र, हे गाणे साकारलेल्या संजय लोंढे यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर आज कोरोना आणि लॉकडाऊनमुळे काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. दोन वेळचे जेवण मिळविण्याची भ्रांत असतानाच लोंढे यांच्या मदतीला पुण्यातील गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते धावून गेले. त्यावेळी लोंढे कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टने नाना पेठेतील राजेवाडी परिसरात राहणा-या शांताबाई फेम संजय लोंढे यांच्या कुटुंबाला धान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत दिली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, मंडळाचे शिरीष मोहिते, मंडळाचे अध्यक्ष रवींद्र बरिदे, अमर लांडे, विक्रांत मोहिते, उमेश कांबळे, रवी धायगावे, राजाभाऊ कांचन, अनुप थोपटे, साहिल करपे, गणेश सांगळे, अमेय थोपटे आदी उपस्थित होते.
सतिश गोवेकर म्हणाले, कोरोनामुळे लोककलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळासह सामाजिक संस्थानी देखील कलाकारांना मदत करायला हवी. प्रत्येक मंडळ किंवा संस्थेने एका कलाकाराची जबाबदारी घेतल्यास त्यांना मोठी मदत होणार आहे.
आनंद सराफ म्हणाले, डिजे किंवा स्पिकर्सच्या भिंतीसमोर थिरकणा-या कार्यकत्याप्रमाणे विविध आपत्तींमध्ये मदत कार्य करण्याकरीता देखील गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते पुढे येतात. संजय लोंढे यांना दिलेली मदत म्हणजे गणपतीचा प्रसाद आहे. यापुढे त्यांना कोणतीही गोष्ट अपुरी पडणारी नाही, याकडे कार्यकर्ते लक्ष देतील, असेही त्यांनी सांगितले.
संजय लोंढे म्हणाले, मागील वर्षापासून रेकॉर्डिंग किंवा स्टेश शो चे एकही काम आलेले नाही. त्यामुळे माझ्यासारख्या व अनेक छोट्या-मोठ्या कलाकारांवर आणि कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. कलाकार काम करण्यास तयार असले तरी देखील काम मिळत नाही. त्यामुळे जगावे कसे आणि कुटुंबाला कसे जगवावे, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. शासनाने देखील आमच्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.