7 जानेवारी रोजी पहाटे महारथ मिरवणुकीने सांगता, भाविकांसाठी चोख व्यवस्था : संस्थान समितीची माहिती
प्रतिनिधी /कुंकळ्ळी
फातर्पा येथील श्री शांतादुर्गा भूमिपुरुष सप्तकोटिश्वर संस्थानचा वार्षिक जत्रोत्सव 3 ते 6 जानेवारी, 2022 पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे. जत्रोत्सव पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी संस्थानच्या कार्यकारी मंडळाने कंबर कसली असून भाविकांना कोणत्याही प्रकारे अडचण भेडसावणार नाही याची खबरदारी घेतली आहे, असे रविवारी फातर्पा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जत्रोत्सवाविषयी माहिती देताना अध्यक्ष दिलखुश नाईक देसाई यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस कार्यकारी मंडळाचे चिटणीस अजय नाईक देसाई, खजिनदार सुजय देसाई व मुखत्यार देवप्पा नाईक देसाई त्याचबरोबर कुंकळळी पोलीस निरीक्षक गुरुदास गावडे हेही उपस्थित होते. सुरक्षेचा विचार करून मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच चोख पोलीस बंदोबस्त राहणार असून रात्रंदिवस पोलीस तैनात असतील शिवाय टेहेळणीसाठी मनोरे उभारण्यात येतील. वाहतूक व्यवस्था तसेच वाहन पार्किंगसाठी नियोजन केलेले आहे. संपूर्ण व्यवस्थेवर पोलीस लक्ष ठेवणार आहेत. शिवाय अग्निशामक दलही सज्ज राहील. पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही याचीही पूर्ण काळजी घेण्यात आली आहे, असे मंडळाकडून याप्रसंगी सांगण्यात आले.
भाविकांना देवीचे सुरळीतपणे दर्शन घेता यावे याकरिता नीट रांगेची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच रोज दुपारी व रात्री भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र भोजनाच्या व्यवस्थेत यंदा बदल करण्यात आला असून त्यामुळे भाविकांना रांगेत उभे राहताना होणारी गैरसोय टळेल. विजेच्या बाबतीत वीज खात्याशी संपर्क केला असून मंदिरावर व मंदिरासभोवतालच्या परिसरात रोषणाई केली जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. सुरक्षेसंबंधी आढावा घेण्यात आलेला असून चोख पोलीस बंदोबस्त राहणार असल्याची माहिती निरीक्षक गावडे यांनी दिली.
विविध कार्यक्रम
पहिल्या दिवशी सोमवार 3 रोजी सकाळी श्रींस महाभिषेक, रात्री विधीपूर्वक नमन व 10 वा. शिबिकोत्सव, नंतर श्रींची चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक, आतषबाजी, आरती, प्रसाद व नंतर कला चेतना, वळवई निर्मित आणि श्रीनिका क्रिएशन, नागेशी-बांदोडा प्रस्तुत दोन अंकी कोकणी विनोदी नाटक ‘भिवपाची गरज ना’ सादर केले जाईल. मंगळवार 4 रोजी सकाळी श्रींस महाभिषेक, रात्री 10 वा. शिबिकोत्सव, नंतर श्रींची मयूर रथातून भव्य मिरवणूक, आतषबाजी, आरती, प्रसाद व मॅजिक शो होईल.
बुधवार 5 रोजी सकाळी श्रींस महाभिषेक, रात्री 10 वा. शिबिकोत्सव, नंतर श्रींची सूर्यरथातून भव्य मिरवणूक, आतषबाजी, आरती, प्रसाद व नंतर कोकणी नाटक ‘अ पूर्ण लव्ह स्टोरी’चा प्रयोग सादर होईल. गुरुवार 6 रोजी सकाळी श्रींस महाभिषेक व रात्री 10 वा. ऑर्केस्ट्रा, शुक्रवार 7 रोजी पहाटे 6 वा. श्रींची महारथातून भव्य मिरवणूक, आतषबाजी, आरती, प्रसाद होऊन सांगता होईल. श्रींस अर्पण केलेले सोन्या-चांदीचे दागिने, कपडे व इतर वस्तूंचा जाहीर लिलाव 8, 9 व 10 जानेवारी रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत केला जाईल, अशी माहिती चिटणीस अजय नाईक देसाई यांच्याकडून देण्यात आली.
नव्या श्री सप्तकोटिश्वर देवळाचा उद्घाटन सोहळा फेब्रुवारीत
दरम्यान, संस्थानच्या नव्याने उभारण्यात येणाऱया श्री सप्तकोटिश्वराच्या देवळाचे काम पूर्ण होत आले असून त्याचा उद्घाटन सोहळा 4 ते 7 फेब्रुवारी, 2022 यादरम्यान होईल. हे संपूर्ण देऊळ पाषाणी दगडांनी बांधलेले असून ते एक अभिनव वैशिष्टय़ ठरेल, अशी माहिती यावेळी अध्यक्ष दिलखुश ना. देसाई यांनी दिली.









