प्रतिनिधी /कुंकळ्ळी
वनविकास महामंडळाच्या अध्यक्षा व पर्येच्या आमदार डॉ. दिव्या विश्वजित राणे यांनी रविवारी दुपारी फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानाला भेट देऊन देवीचा आशीर्वाद घेतला. त्यांनी यावेळी कापड, खणा-नारळाने देवीची ओटी भरली. त्यापूर्वी रविवारी सकाळी डॉ. दिव्या राणे यांनी जांबावलीतील श्री रामनाथ दामोदर संस्थानाला भेट देऊन श्री दामोदराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.
डॉ. राणे यांनी यावेळी दिलेल्या माहितीनुसार, कामांत व्यस्त राहिल्यामुळे नवस फेडण्याचे राहून गेले होते. रविवारी कोजागिरी पौर्णिमा असल्याने वेळ काढून त्यांनी फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीचा आशीर्वाद घेतला. त्यापूर्वी सकाळपासून आपले कुलदैवत व इतर देवालयांनाही भेट देऊन त्यांनी दर्शन घेतले. श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानात देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी संस्थान कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांचे देवस्थान समितीकडून स्वागत करण्यात आले. यावेळी अध्यक्ष कवेंद्र नाईक देसाई, सचिव विराज देसाई, खजिनदार दर्शन देसाई, मुखत्यार सुभाष देसाई व माजी अध्यक्ष सुभाष देसाई यांनी कार्यालयात डॉ. राणे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिलखुलास चर्चा केली. आमदार डॉ. दिव्या राणे यांना समितीकडून देवीची प्रतिमा तसेच देवीच्या मूर्तीला नेसवलेले कापड भेट म्हणून देण्यात आले आणि देवीच्या आगामी जत्रोत्सवाचे निमंत्रणही त्यांना देण्यात आले.









