कॅबमधून फिरताना मला जे काश्मीर जाणवलं ते मला एखाद्या कसलेल्या लेखकाप्रमाणे शब्दात लिहायला जमणार नाही. कारण मी लेखक नाही तर चित्रकार आहे. तरीही मला सामान्य पातळीवर जे जाणवलं ते मी लिहायचा प्रयत्न करतो आहे. श्रीनगरच्या रस्त्यावरून फिरतांना मला कुठेही स्त्रियांनी, मुलींनी बुरखा परिधान केलेला दिसला नाही. काश्मीरी लोक शांतपणे आपले रोजचे व्यवहार पार पाडत होते. निसर्गानं काश्मीरला जे अपरिमित सौंदर्य बहाल केलं आहे ते डोळय़ात मावत नव्हतं. उंचच उंच पाईनचे वृक्ष, आक्रोड, बदामाचे वृक्ष आणि बर्फाच्छादित डोंगर हे वैभव डोळय़ात साठवायचा मी प्रयत्न करत होतो.
घरात आमचं सहलीला जायचं डिसेंबरमध्येच ठरलं होतं. मुलांनी विमानाचं बुकिंग करण्यापूर्वीच 10 दिवसांची रजा काढून तयारीत रहा, असं प्रेमानं बजावलं होतं. पण जेव्हा काश्मीरला जायचं असं समजलं, तेव्हा माझ्या पोटात मोठा गोळा आला होता. कारण बरीच वर्षे सततचे दहशतवादी हल्ले, बंदचे पुकारे, दगडफेक यांनी काश्मीरचे जनजीवन ठप्प झाले आहे अशा मीडियावरून सतत बातम्या ऐकत व वाचत होतो. त्यानंतर केंद्र सरकारने 370 कलम हटवून जम्मू-काश्मीर केंद्रशासित केल्यानंतर सध्या तेथे कशी स्थिती असेल याविषयी शंका होती. शेवटी हो ना करता मी सौ. रेणुका आणि मुलगा मंदार व त्याची पत्नी अमृता असे चौघेजण जायचं अखेर ठरलं.
जाण्यापूर्वीची तयारी म्हणून औषधांची,
गरम कपडय़ांची तयारी करता करता 20 फेब्रुवारीचा
दिवस उजाडला. मुलांनी विमानाचं, हॉटेलचं
बुकिंग, कागदपत्रे सर्व तयार ठेवले होतं. रात्री 10 वाजता गोव्याहून चंदीगड व चंदीगड ते श्रीनगर
असा प्रवास होता. 21 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता आम्ही सर्व श्रीनगरमध्ये पोचलो. एअरपोर्टवरून बोटहाऊसपर्यंत
जाण्यासाठी कॅबचा ड्रायव्हर आमची वाटच पहात होता. श्रीनगरमध्ये
पाय ठेवल्याबरोबर प्रचंड थंडीची पहिली ओळख झाली. एअरपोर्टच्या
बाहेर पडेपर्यंत लष्कराच्या कडक नजरेखालून आम्ही सर्व बोटहाऊसमध्ये 9 वाजता पोचलो. बोटहाऊस म्हणजे पाण्यावरचा राजवाडाच होता.
संपूर्ण लाकडातील कोरीव कामापासून काश्मीरातील कलाकारीचा प्रत्यय येत
होता. बोटहाऊसमधील सर्व दालनं, दिवाणखाना,
डायनिंग रुम सर्व खोल्या लाकडातील अप्रतिम कोरीव कामांनी सजलेल्या होत्या.
चहाच्या टेपासून टेबल, खुर्ची, बेड सर्वत्र कलाकुसरीची पखरण झालेली होती. थोडय़ाच वेळात
आमच्यासमोर काश्मिरी चहा (कावा), बिस्किटं,
पोहे असा नाष्टा आला. त्याचा समाचार घेऊन आम्ही
सर्वजण श्रीनगर दर्शनासाठी निघालो. आमचा कॅब ड्रायव्हर अब्दुल
हमीद खूपच मनमोकळा होता. आमच्या संपूर्ण सहलीत अगदी परतीच्या
विमानप्रवासापर्यंत तो आमच्याबरोबरच होता. श्रीनगरचं वैभव,
निसर्ग दाखवताना त्याची रनिंग कॉमेटरी सतत चालू होती. त्याच्या बोलण्यातून तो कुठंही हातचं राखून बोलत नव्हता. अटलबिहारी वाजपेयींच्याबद्दल
त्याला नितांत आदर दिसून आला. समझोता एक्स्प्रेस चालू करून अटलजींनी
काश्मीरीच्या मनात पक्के स्थान निर्माण केलेले दिसले. त्याचप्रमाणे
पाकिस्तानी पंतप्रधान इम्रानखान यांनी भारतीय वैमानिक अभिनंदन वर्धमान याला सोडण्याचा
शहाणपणा केला म्हणून बरं झाले नाहीतर मोदिजीनी मोठं युध्द छेडलं असतं असं तो म्हणाला.
दोन्ही काश्मीर (पाकव्याप्तसह) कुठल्यातरी एकाच देशाकडे राहणं चांगलं होईल,
असा
अभिप्राय त्यानं व्यक्त केला.
कॅबमधून फिरताना मला जे काश्मीर जाणवलं ते मला एखाद्या कसलेल्या लेखकाप्रमाणे शब्दात लिहायला जमणार नाही. कारण मी लेखक नाही तर चित्रकार आहे. तरीही मला सामान्य पातळीवर जे जाणवलं ते मी लिहायचा प्रयत्न करतो आहे. श्रीनगरच्या रस्त्यावरून फिरतांना मला कुठेही स्त्रियांनी, मुलींनी बुरखा परिधान केलेला दिसला नाही. काश्मीरी लोक शांतपणे आपले रोजचे व्यवहार पार पाडत होते. निसर्गानं काश्मीरला जे अपरिमित सौंदर्य बहाल केलं आहे ते डोळय़ात मावत नव्हतं. उंचच उंच पाईनचे वृक्ष, आक्रोड, बदामाचे वृक्ष आणि बर्फाच्छादित डोंगर हे वैभव डोळय़ात साठवायचा मी प्रयत्न करत होतो. निसर्गानं सौंदर्याची दिलेली देणगी केवळ कॅमेऱयात किंवा डोळय़ात साठवून ठेवणं खूप अशक्य आहे. आमचे सर्वांचे कॅमेरे दिवसभरात फोटोंनी भरायचे व रात्री परतल्यावर परत ते लॅपटॉपमध्ये अपलोड करून दुसऱया दिवशी पुन्हा ते कमी पडायचे.
इतक्मया सुंदर निसर्ग सान्निध्यात राहणारे काश्मिरी लोकही तितकेच सुंदर आहेत. त्यामुळेच कदाचित ‘भारताचं नंदनवन’ अशी काश्मीरची ओळख सार्थ आहे. पहिल्या दिवशी आम्ही शंकराचार्य मंदिर पाहिलं व शिवरात्र असल्याने महाप्रसादही घेण्याचं भाग्य लाभलं. भाविक ‘जय भोलेनाथ’ असा गजर करत पायऱया चढत होते. शंकराचार्य मंदिराचे व्यवस्थापन लष्कराच्या अखत्यारीत आहेत. इथे लष्कराचा पहारा होता व संशय आल्यास संबंधीत व्यक्तींची तपासणी करून मगच त्याला पुढे जाऊ देण्यात येत होते. त्यानंतर दल सरोवर, निशांत बाग, चष्मेशाही, चारचिनार ही सौंदर्यस्थळं पाहून घेतली. दल सरोवरात शिकाऱयात बसून फ्लोटिंग मार्केटमध्ये खरेदी करणं हा एक छान अनुभव होता. रात्री बोटहाऊसवर परतल्यानंतर विजेचा लपंडाव सुरू होता. बोटीच्या मालकांनी सांगितलं की आमची वीज दिल्लीकरांना दिली जाते व आमच्याकडे लोडशेडिंग असतं. आणि मोदीसाहेबांनी इंटरनेट बंद ठेवल्याने आम्हाला 6 महिन्यापासून खूप अडचणी येत आहेत आणि आमचा पर्यटन व्यवसायही थोडा खालावला आहे.
त्यामुळे हॉटेलचे दरही खाली आले आहेत असे त्याने सांगितले. त्याचे बोटहाऊस सहा कोटी रूपयांचे आहे. त्यामुळे त्याला ते खाली ठेवून चालत नाही. त्याची दोन्ही मुले दिल्लीत नोकरी करतात.
दुसऱया दिवशी आम्ही सोनमर्ग पहाण्यासाठी निघालो. साधारण जानेवारी अखेरपासूनच सोनमर्ग पर्यटकांनी गजबजलेले असते. पायथ्यापर्यंत कॅब जाऊ शकते. तेथून पोनी (खेचर) सवारी करावी लागते. बर्फात घालण्याची साधने भाडय़ाने उपलब्ध होतात. सोनमर्ग हे एक ग्लेशियर आहे. श्रीनगरपासून साधारण 80 कि. मी. वर येथे बर्फातील मजा अनुभवण्यासाठी भरपूर पर्यटक आले होते. सायंकाळी आम्ही परत बोटहाऊसवर आलो. येथे मांसाहारी पदार्थांची रेलचेल असते. तिसरे दिवशी आम्ही श्रीनगरहून गुलमर्ग या हिलस्टेशनला भेट देणार होतो. रविवार असल्याने श्रीनगरला सुप्रसिद्ध संडे मार्केटला फिरण्यात आमचा वेळ कसा गेला ते समजलंच नाही. या संडे मार्केटमध्ये दुतर्फा रस्त्यावर जॅकेटस्, कपडे, इलेक्ट्रिक वस्तू, क्रोकरी इ.चा समावेश होता. मार्केटमध्ये ग्राहकांची अक्षरशः जत्रा भरली होती.
काही वेळातच आम्ही
गुलमर्ग या हिल स्टेशनच्या पायथ्याशी तनमर्गला आलो तेथून संपूर्ण बर्फातून लोकांना,
टायरला चाकांना लोखंडी साखळी लावलेल्या गाडीतून गुलमर्गला जावे लागते.
तेथे बर्फात घालायचे बूट आणि जॅकेटस् भाडय़ाने घेऊन 12 किलोमीटरवर असणाऱया गुलमर्गकडे निघालो. गुलमर्ग हे ठिकाण
बारामुल्ला जिल्हय़ात येतं. नखशिखांत बर्फानं न्हालेल्या गुलमर्गकडे
जाताना मी
ऍलर्जिक
अस्थमा पेशन्ट असल्याने थोडा घाबरलो होतो. आमचं
हॉटेलही पूर्ण बर्फानं वेढलेलंच होतं. पण हॉटेलमध्ये पोचताच गरम
बिछाना आणि शेगडी रुम हिटरची व्यवस्था होती. त्यामुळे खूप सुसहय़
झालं. मुलं बर्फात मौज करण्यासाठी गेली. आमच्या हॉटेलसमोरच स्केटिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी सकाळी आठ वाजताच मुलांची
वर्दळ असायची.
दुसऱया दिवशी सकाळी सर्वजण गंडोला राईडसाठी निघालो.
गुलमर्गहून गंडोला या
स्पॉटवरून
फेज
1 व फेज 2 वर रोपवेने जायला लागतं. गंडोला या हिल स्टेशनवर बर्फवृष्टीचा (स्नो फॉल)
अनुभव आनंद घेता आला. गुलमर्गला हॉटेलसमोरच एक
शिवमंदिर होतं. त्याला ‘महाराणी टेंपल’
म्हटलं जातं. येथे ‘आपकी
कसम’ या राजेश खन्ना, मुमताज यांच्यावर
चित्रित झालेलं ‘जय जय शिवशंकर’ हे गाणं
प्रसिद्ध आहे. बर्फात यथेच्छ खेळून झाल्यावर आम्ही पहेलगामला
निघालो. पहेलगाम हेही एक हिलस्टेशनच आहे. येथूनच 14 कि. मी. वर असणाऱया बाबा अमरनाथकडे जाता येतं. येथेही बर्फाच्छादित
पर्वतावर स्केटिंग, हॉर्स राईड व इतर खेळ खेळण्यासाठी पर्यटक
येतात. पहेलगामवरून मिनी स्वित्झर्लंड, बेसरान, बेताब
व्हॅली
ही ठिकाणे पहाण्यासाठी जाता येतं. वाटेत दोनवेळा
आम्ही पुलवामा आत्मघाती हल्ल्याच्या ठिकाणाजवळून गेलो. या मार्गावर
कडक लष्करी बंदोबस्त होता. कारण या मार्गावर सतत लष्करी वाहनांची
वर्दळ असते.
येथे एक दिवस राहून आम्ही परत श्रीनगरकडे दुसऱया दिवशी सकाळी निघालो. श्रीनगरकडे निघताना गरम कपडे, जॅकेट्स हे कधी काढतो असं झालं होतं. सभोवताली सतत पांढरं शुभ्र बर्फ पाहून थोडा कंटाळाही आला होता. श्रीनगरला पोचल्यावर आम्ही बोटहाऊसवर न जाता हॉटेलवरच उतरलो. दुपारच्या जेवणात कश्मिरींचा अत्यंत अभिमानाचा पदार्थ ‘वाझवान’ मागवले होते. हा मांसाहारी पदार्थ येथील लग्नसमारंभातला मुख्य मेन्यू असतो. अनेक प्रकारात मिळणारा हा पदार्थ मिळण्याची स्वतंत्र हॉटेल आहेत. प्रत्येक हॉटेलमध्ये ‘कहावा’ (काश्मीरी चहा) बनवण्याचे विशिष्ट प्रकाराचे पात्र स्वतंत्र टेबलवर ठेवलेले असते. हे पात्र व त्यावरील कलाकुसर पहाण्यासारखी असते. ‘वाझवान’चे स्टॉल्स जागोजागी होते पण मद्याची दुकाने कुठेही आढळून आली नाहीत. त्याचप्रमाणे रस्त्यावर भटकी जनावरे दिसल्यास कॉपोरेशनच्या गाडय़ा त्यांना उचलून नेत असल्याचे दिसून आले. टूव्हिलर्स कमी आणि सिटी बसेस नसल्याचे दिसून आले. छोटय़ा वाहनांमधून वाहतूक सुरू होती. भिकारी कुठेही दिसले नाहीत. काश्मीर खोऱयातील लोक सधन असल्याचे चित्र दिसले. शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी लोक मोठय़ा प्रमाणात मशिदींमध्ये जात असलेले दिसले. त्याचप्रमाणे श्रीनगर विमानतळाच्या आवारात सुमारे 200 लोक नमाझ पढत असलेले दिसले.
आज पायी फिरत पूर्ण श्रीनगर फिरायचं ठरवलं होतं. लालचौकाकडे जाणारा रस्ता खूप मोठा आहे. दोन्ही बाजूला दुकानं आणि फुटपाथवरचे विपेते, पर्यटकांनी फुललेले होते. त्याचवेळी शाळा, कॉलेजीस नुकतीच सुरू झालेली होती. रस्त्यावर सेल्फी काढताना एक मुलगा मध्येच आला. आम्हाला त्याने विचारले की, हा फोटो फेसबुकवर घालून दाखवता का? अर्थात इंटरनेट बंद असल्याने ते शक्मय नाही म्हटल्यावर तो म्हणाला, ‘आय हेट मोदी.’ इंटरनेट सध्या बंद असल्यामुळे तो मुलगा इतका वैतागला होता.
काही विपेत्यांनी, रिक्षावाल्यांनी आम्हाला कसं वाटलं काश्मीर?, असं विचारलं आम्ही खूप छान म्हटल्यावर मग ‘मीडिया’ असं उलट चित्र का दाखवतो? असा प्रश्न करत त्यानी नाराजी दाखवली. त्याचप्रमाणे 370 कलम हटवलं तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही, अशा प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केल्या. याच रस्त्यावर ‘शक्ती स्वीटस्’ हे प्रसिद्ध मिठाईचं दुकान आहे. इथला ‘गाजर हलवा’ प्रसिद्ध आहे. दुसऱया दिवशी म्हणजे शुक्रवारी आमचा परतीचा विमानप्रवास होता. 10 वाजताच आम्ही हॉटेल सोडून एअरपोर्टकडे निघालो. काश्मीरचं बदलंतं रुपडे पुन्हा पुन्हा वळून पहावसं वाटत होतं. काश्मीरचा निरोप घेताना पुन्हा पुन्हा परत यावं हे सर्व पहायला असं वाटतं होतं. इतक्मया सुंदर अशा पर्यटनस्थळाला प्रत्येकानं भेट द्यायलाच हवी. जड अंतकरणानं आम्ही काश्मीरला ‘बाय बाय’ म्हटलं आणि परतीचा प्रवास सुरू झाला.