प्रतिनिधी /बेळगाव
शहापूर मुक्तीधाम स्मशानभूमीबाहेर गादी व जुने कपडे टाकण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या काहींकडून असे प्रकार केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. तसेच इतरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
अंत्यसंस्कार करण्यासाठी आणलेल्या मृतदेहासोबत गादी व जुने कपडे आणले जातात. अंत्यसंस्कारानंतर योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असते. परंतु काहीवेळा हे साहित्य मिळेल त्या ठिकाणी टाकले जाते. दोन दिवसांपूर्वी स्मशानभूमीबाहेरील आसन व्यवस्थेवर गादी व जुने कपडे टाकले आहेत. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सध्या प्रत्येकजण आरोग्याची खबरदारी घेताना दिसत आहे. असे असताना मृतांचे कपडे व गाद्या रस्त्याशेजारी टाकण्यात येत आहेत. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे असे प्रकार करू नयेत, अशी मागणी करण्यात येत आहे.









