स्मार्ट सिटीच्या भोंगळ कारभाराचा व्यावसायिकांना फटका
प्रतिनिधी / बेळगाव
कोणतेही नियोजन न करता स्मार्ट सिटीचे काम आटोपण्याचा फटका नागरिक व व्यावसायिकांना बसू लागला आहे. रविवारी बेळगाव शहर व उपनगरांमध्ये तुरळक पाऊस झाला. शहापूर खडेबाजार येथे पावसाचे पाणी थेट दुकानांमध्ये शिरल्याने व्यापाऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे स्मार्ट सिटीच्या भेंगळ कारभाराचा फटका व्यापारी व नागरिकांना बसला आहे.
शहापूर खडेबाजार येथील श्रीमती साडी सेंटरमध्ये पावसाचे पाणी दुकानात शिरून साडय़ा व कपडय़ांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. 25 वर्षांपासून येथे दुकान असून पहिल्यांदाच अशा प्रकारे दुकानात पाणी शिरल्याचे दुकानदारांनी सांगितले. कपडे भिजल्याने झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
खडेबाजार शहापूर परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत डेनेज, गटारी व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. परंतु कंत्राटदार व अधिकाऱयांचा समन्वय नसल्याने घिसाडघाईने काम पूर्ण करण्यात आले. पावसाचे पाणी जाण्यास जागा नसल्याने पाणी सखल भागात असणाऱया दुकानांमध्ये शिरत आहे. स्मार्ट सिटीच्या कारभारामुळे व्यापाऱयांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.









