व्यवसायात नुकसान झाल्याने संपविले जीवन
प्रतिनिधी / बेळगाव
समर्थ अपार्टमेंट, सराफ गल्ली, शहापूर येथील एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
गणेश पंढरीनाथ कुलकर्णी (वय 32) असे त्या युवकाचे नाव आहे. पहिल्या पत्नीशी झालेला घटस्फोट, व्यवसायातील नुकसान यामुळे तणावाखाली येवून त्याने आपले जीवन संपविल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
गणेशने मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शिनोळी येथील आपल्या बहिणीला फोन करुन उद्या तुझ्याकडे येणार असे सांगितले होते. घरात तो एकटाच राहत होता. आई, वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. बुधवारी तो आला नाही म्हणून त्याच्या बहिणीने त्याला फोन केला.
फोनलाही प्रतिसाद नाही म्हणून परिचयातील तरुणाला घरी पाठवून बघून येण्यास सांगितले. त्यावेळी दरवाजाला आतून कडी होती. संशय बळावून घरात डोकावून पाहिले असता त्या युवकाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. दरवाजा फोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्याची बहिण श्रुती हिने शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे.









