शुभम शेळके यांना दिले समर्थन : खासबाग-शहापूर येथे भव्य स्वागत
प्रतिनिधी / बेळगाव
म. ए. समितीने आजवर कधीच धर्माचे राजकारण केले नाही. त्यामुळेच बेळगावचा मुस्लीम समाज समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सोमवारी सायंकाळी खासबाग येथे शहापूर मुस्लीम समाजाने शुभम शेळके यांचे जंगी स्वागत करत आपला पाठिंबा जाहीर केला. शहापूरसोबतच दक्षिण मतदारसंघातील सर्व मुस्लीम समाज लवकरच पाठिंबा देईल, असा विश्वास शहापूर मुस्लीम समाजाने व्यक्त केला.
म. ए. समितीने सर्व समाजघटकांना घेऊन सीमाप्रश्नाचा लढा उभारला आहे. त्यामुळेच यापूर्वीही अनेक मुस्लीम समाजातील नागरिक नगरसेवक, जि. पं. सदस्य, ग्रा. पं. सदस्य म्हणून निवडून आले आहेत. म. ए. समितीने इतर कोणत्याही समाजांना त्रास न दिल्यामुळेच हा समाज आजही समितीच्या पाठिमागे उभा असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले
आहे.
यावेळी म. ए. समितीचे कार्यकर्ते अहंमद रेशमी, दिवानसाब देसाई, रियाज फनिबंद, तौफिक देसाई, रियाज पटेल, सोहेल रेशमी यांच्यासह शहापूर मुस्लीम समाजाचे सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









