वकिलांचा रास्तारोको, पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
होसूर-शहापूर येथे घरासमोर थांबलेल्या ऍड. शीतल रामशेट्टी यांना पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जबर मारहाण केली. मी वकील आहे मारहाण का करत आहात, असे विचारले असता वकील असशील तर फार मोठा झालास का? असे म्हणून मारहाण केली. यामध्ये शीतल यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. मारहाण करुन तेथून पोलिसांनी काढता पाय घेतला.

या घटनेनंतर गुरूवारी ऍड. शीतल यांनी आपल्या बाबतीत घडलेल्या घटनेची माहिती वकिलांना दिली. त्यानंतर वकिलांनी मुख्य रस्त्यावरच रास्तारोको सुरू केला. अचानकपणे केलेल्या या रास्तारोकोमुळे काही गोंधळ उडाला. त्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वकिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जोपर्यंत राघवेंद्र हवालदार यांना निलंबीत करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू, असा पावित्रा वकिलांनी घेतला.
दुपारपर्यंत हे आंदोलन सुरूच होते. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी भेट घेतली. तुम्ही तक्रार लिहून द्या, मी तक्रार घेतो. त्यानंतर चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करतो, असे आश्वासन दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनाही निवेदन देवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.ऍड. मोहन माविनकट्टी, ऍड. भगतसिंग रोकडे, खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी, ऍड. मारुती कामण्णाचे, ऍड. नंदकुमार पाटील, ऍड. अमृत कोल्हटकर, ऍड. प्रभू यदनट्टी, ऍड. प्रवीण करोशी, ऍड. शिवपुत्र फटकळ यांच्यासह वकील उपस्थित होते.









