प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटीचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना करण्यात आलेले खोदकाम, टाकण्यात आलेल्या पाईप, दोन्ही बाजूंना वाहनांचे पार्किंग, रस्त्यांवर भाजी विकणारे विपेते आणि त्यातच हातगाडय़ांद्वारे फळे विक्री करणारे फेरीवाले या सर्वांमधून वाहने चालवायची कशी? असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. या रोजच्याच समस्येमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
बॅ. नाथ पै चौक ते बँक ऑफ इंडिया कॉर्नरपर्यंत वाहतुकीची कोंडी होत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत कामे सुरू असल्याने ठिकठिकाणी मातीचे ढिगारे, मोठय़ा पाईप टाकण्यात आल्या आहेत. त्यातच फेरीवाले हातगाडय़ा लावत असल्याने वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. यामुळे स्थानिक व्यापारी व विपेत्यांमध्ये वारंवार बाचाबाचीचेही प्रकार होताना दिसत आहेत. वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
दोन्ही बाजूंनी वाहनांचे पार्किंग
स्मार्ट सिटीचे काम सुरू होण्यापूर्वी या मार्गावर एकाच बाजूने वाहने लावण्यात येत होती. परंतु सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने लावण्यात येत आहेत. यामुळे इतर वाहने जाण्यास जागा उरत नाही. याचा फटका स्थानिक व्यापाऱयांनाही बसू लागला आहे. त्यामुळे यावर काहीतरी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
मुख्य मार्गावरील विक्रीमुळे गर्दीत वाढ
भाजी तसेच इतर विक्री करणाऱया विपेत्यांसाठी सराफ गल्ली व दाणे गल्ली येथे जागा देण्यात आली आहे. परंतु बरेच विपेते त्या ठिकाणी विक्री न करता शहापूर खडेबाजार येथील मुख्य मार्गावर विक्री करीत आहेत. आधीच रस्ता अरुंद असताना त्यातच विपेते बसत असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे या विपेत्यांना या ठिकाणी बसू देऊ नये, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.









