वार्ताहर / यडाव
शहापूर येथील तुळजाभवानी अपार्टमेंट परिसरात पूर्ववैमनस्यातून एकावर चौघांनी चाकूहल्ला केला. अमोल प्रभाकर कोंडारे (वय ३०, रा. श्रीरामनगर-तारदाळ) असे जखमीचे नाव आहे. त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शहापूर पोलिस ठाण्यात सुरू होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, शुभम ठोमके व आकाश ठोमके (दोघे रा. दानोळी, ता.शिरोळ)यांच्यासोबत पंधरा दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्याला मोबाईल चोरीचीही किनार आहे. त्या वादातून मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शुभम व आकाश यांच्यासह अन्य दोघा अनोळखी साथीदारांनी तुळजाभवानी अपार्टमेंट परिसरात अमोल याला गाठले. तेथे चौघांनी त्याच्यावर चाकूने छातीवर व पोटावर बार केले. त्यानंतर जखमी अमोलला आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.









