कौन्सिल ऑफ एज्युकेशनचा महत्वाकांक्षी प्रकल्प : विविध खेळांच्या मैदानांसह जॉगिंग ट्रकच्या निर्मितीसाठी 1 कोटी रुपये खर्च करणार
संग्राम काटकर/कोल्हापूर
शहाजी लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबरच शहर परिसरातील विविध खेळांच्या खेळाडूंना सरावासाठी मैदान मिळवून देण्याचा कौन्सिल ऑफ एज्युकेशनने एक महत्वाकांक्षी स्पोर्टस् कॉम्फ्लेक्स उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प हाती घेण्यामागे ‘निरामय आरोग्य चळवळ’ ही संकल्पना दडली आहे. या संकल्पनेनुसार शहाजी लॉ कॉलेजच्या 5 एकराच्या मैदानात नागरिकांसाठी जॉगिंग ट्रक तयार केला जाणार आहेच, शिवाय व्हॉलीबॉल मैदान, क्रिकेटच्या दोन टर्फविकेटसह बॅडमिंटन हॉलचीही उभारी करण्यात येणार आहे. याचबरोबर मैदानातील मुळच्या दोन्ही बास्केटबॉल ग्राऊंडला अत्याधुनिक सिंथेटिक कोटींगही (रबर कोटींग) केले जाणार आहे. या सर्व कामांसाठी कौन्सिल ऑफ एज्युकेशनकडून तब्बल 1 कोटी रुपये खर्च्ची घालण्याची तयारी ठेवली आहे.
खेळाडूंच्या भविष्याचा विचार करुन काहीच महिन्यांपूर्वी कौन्सिलने शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानात विविध खेळांची मैदाने उभारण्याचा निर्णय घेतला. नुसता निर्णय घेतला नाही तर पैशाची तरतुद करुन बॅडमिंटन हॉलच्या बांधकामालाही सुरुवात केली. या हॉलमध्ये बॅडमिंटनसह विविध इनडोअर खेळांचा सराव करता येईल, त्यांच्या स्पर्धाही आयोजित करता येतील अशी हॉलची रचना असणार आहे. आता लवकरच मैदानाच्या पश्चिम बाजूला व्हॉलीबॉल मैदान, क्रिकेटच्या दोन टर्फविकेट तयार केल्या जाणार आहेत. दरम्यानच्या काळात मैदानातील मुळच्या दोन्हीही बास्केटबॉल ग्राऊंडला अत्याधुनिक बनावटीचे सिंथेटिक कोटींगही केले जाईल. 7 मिलीमीटरचे हे कोटींग असेल. ते पुण्याहून मागवण्यात येणार आहे. एका मैदानावरील कोटींगसाठी 4 लाख रुपये खर्च मोजावा लागणार आहे. हे कोटींग बसवल्यामुळे मैदानात प्रत्यक्ष सामना खेळताना कोणत्याही खेळाडूला इजा होणार नाहीच. शिवाय खेळाडूंच्या गुडघा, घोटय़ाला कुशनही मिळणार आहे. या कुशनमुळे खेळाडू हा भविष्यात गुडघा व घोटादुखीपासून सुरक्षीत राहणार आहे.
व्हॉलीबॉल मैदान, क्रिकेटच्या दोन टर्फविकेटही तयार करण्याचे नियोजनही कौन्सिल ऑफ एज्युकेशन केले आहे. मैदाने उभारणीची कामे पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण मैदानात गोल आकाराचा जॉगिंग ट्रकही साकारला जाणार आहे. या ट्रकचा शहाजी लॉ कॉलेजच्या परिसराबरोबरच संपूर्ण शहरवासियांना मॉर्निंग वॉकसाठी उपयोग होणार आहे. येत्या वर्षभरात मैदानांसह जॉगिंग ट्रक बांधणीचे काम पूर्ण करण्यावर भर असणार आहे. सर्व खेळांची मैदाने पूर्ण झाल्यानंतर योगा, ध्यानधारणा, क्रिकेट, बॅडमिंटन, बास्केटबॉल व व्हॉलीबॉल या खेळांचे प्रशिक्षणही वर्ग सुरु केले जाणार आहेत. या वर्गांमध्ये शहरातील खेळाडूंना सहभागी करुन घेतले जाईल. प्रशिक्षण वर्गातील सहभागाच्या बदल्यात खेळाडूंकडून शुल्क घेऊन ते प्रशिक्षकांना मानधन म्हणून दिले जाणार आहे. सर्वात महत्वाचे सामन्यात इजा झाल्यास त्यावर कोणते प्राथमिक उपचार घेता येतील याची माहिती देणारे फिजीओथेपी सेंटरही मैदानात उभारले जाणार आहे. शिवाय सेंटरमध्ये विविध आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनाही फिजीओथेरपीसाठी प्रवेश दिला जाणार आहे.
गरज भासल्यास शासनाकडूनही निधी घेऊ…
विविध खेळांची मैदाने उभारणी करताना मैदानांवर खेळाडूंसाठी आणखी काय सुविधा निर्माण करता येतील, याचाही अभ्यास करुन त्या सुविधा देण्यावर भर दिला जाईल. यासाठी पैशाची गरज भासल्यात ते मिळवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावाही केला जाईल. तेंव्हा शासनाने खेळाडूंच्या भविष्याचा विचार करुन निधी देऊन कौन्सिल ऑफ एज्युकेशनला सहकार्य करावे, एवढीच अपेक्षा आहे. – डॉ. विश्वनाथ मगदुम (संचालक : कौन्सिल ऑफ एज्युकेशन)