व्यापाऱयांसह खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ
प्रतिनिधी /बेळगाव
मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन रविवारी सायंकाळी शहरासह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. विजांचा कडकडाट अन् ढगांचा गडगडाटासह शहर परिसरातील काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस झाला. बाजारपेठेतील रस्त्यांवर पाणी साचल्याने व्यापाऱयांसह खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.
शनिवारी, रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. ढगाळ वातावरणामुळे उष्म्यात वाढ झाली होती. रविवारी सायंकाळी अखेर शहरासह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसाने काकतीवेस, गणपती गल्ली, खडेबाजार, नरगुंदकर भावे चौक, वीर सावरकर चौक, कलमठ रोड आदी रस्त्यांवर पाणीच पाणी झाले.
तसेच गटारींतून कचरा साचून राहिल्याने रस्त्यांवर पाणी साचून होते. त्यामुळे व्यापारी वर्गांसह पादचाऱयांची तारांबळ उडाली. विजांचा कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसाने रस्ते काही काळ ओस पडले होते. रविवार सुटीचा दिवस असल्याने आणि दिवाळी तोंडावर आल्याने बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रविवारी झालेल्या पावसाने रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. त्यामुळे बाजारात आलेल्या नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला.
सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांनाही कसरत करत मार्ग शोधावा लागला. या पावसाने दिवाळीसाठी बहरलेल्या बाजारात काही काळ परिणाम झाला.
पावसाने पिकांना बसला फटका
रविवारी झालेल्या पावसाने पिकांना फटका बसला आहे. सुगी हंगामाला प्रारंभ झाल्याने शेतकऱयांची धांदल सुरू आहे. कापणी केलेल्या काही भातात रविवारी झालेल्या पावसाने पाणी साचले. त्यामुळे शेतकऱयांतून चिंता व्यक्त होत आहे.
शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाल्याने कापणी झालेल्या भात पिकाला फटका बसला. मागील आठवडय़ापासून भात कापणीला प्रारंभ झाला आहे. मात्र रविवारी ढगाळ वातावरण निर्माण झालेल्या पावसाने कापणी झालेल्या शिवारात पाणी साचले. त्यामुळे भात पीक काळे पडण्याच्या भीतीने शेतकऱयांची चिंता वाढली आहे.









