प्रतिनिधी/कोल्हापूर
शहर आणि परिसरात 70 वा प्रजासत्ताकदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रजासत्ताकदिनी रविवारी सकाळी चित्रकला स्पर्धा, वीरपत्नींचा सत्कार, व्याख्याने, रक्तदान शिबिर, संविधान उद्देशिका सामूहीक वाचन आदी उपक्रम राबवले गेले.
शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात रिक्षा सौंदर्य स्पर्धा घेण्यात आल्या. शाहू स्मारक येथे मराठा वधुवर मेळावा झाला. मराठा रियासत संस्थेच्यावतीने शिवाजी चौकात जिलेबी वाटप करण्यात आले. शाहू स्मारक येथे सायंकाळी माणगाव परिषद शताब्दी महोत्सव समितीच्यावतीने भारतीय संविधान आणि लोकशाही यावर डॉ. विजय पाटील यांचे व्याख्यान झाले. दुधाळी येथील विक्रम हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. शांतीदुत आखाडय़ाच्यावतीने हॉकी स्टेडियम येथे तलवारीने लिंबू कापण्याचा उपक्रम राबवला गेला. फेथ फौंडेशनच्यावतीने रंकाळा पदपथ येथे वीरपत्नींचा गौरव करण्यात आला. दुर्गेश लिंग्रस यांच्यावतीने राजारामपुरी पहिल्या गल्लीत राजाराम महाराज उद्यानात चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. दसरा चौक येथे संविधान बचाव कृती समितीच्यावतीने राज्यघटनेच्या सरनाम्याचे उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधानाच्या सन्मानार्थ बिंदू चौकात सायंकाळी स्वाक्षरी मोहीम राबवली गेली. शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यान येथे महिलांसाठी जुन्या खेळांचा मेळा उपक्रम राबवण्यात आला. स्काय फौंडेशनच्यावतीने मंगळवार पेठेतील मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. सायंकाळी वीरपत्नींचा सत्कार करण्यात आला.