प्रतिनिधी/ बेळगाव
तिळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, गाजराची कोशींबिर, सोले व वाटाण्याची उसळ, विविध प्रकारच्या स्वादिष्ट चटण्या, मुगाची खिचडी असे वैशिष्टय़पूर्ण पदार्थ करून त्याची ताटे शेजारी-पाजारी देऊन महिलांनी मंगळवारी भोगी साजरी केली.
या निमित्ताने बाजारपेठेतही सोमवारी संध्याकाळपासूनच खरेदीसाठी गर्दी झाली होती. बेळगावची भाजी रसरशीत आणि चवदार असल्याने येथील भाजीला मागणी आहे. येथूनच गोव्यालाही भाजी पुरवठा होतो. बेळगावातच मिळणारे हिरवे वाटाणे अन्यत्र कोठेही मिळत नसल्याने त्याचेही आकर्षण परगावच्या मंडळींना आहे. भोगीच्या निमित्ताने वाटाण्याच्या शेंगांची सर्वाधिक खरेदी झाली आणि अर्थातच गेल्या आठवडय़ात 80 रुपये किलो असा दर असलेल्या या शेंगांचा सोमवारी 100 रुपये किलो असा भाव वधारला होता.
संक्रांतीला सुगड पूजन केले जाते. त्यामुळे बाजारात सुगडे आली आहेत. शिवाय तिळगूळ, रेवडी, मलिदा हे खाद्यपदार्थही उपलब्ध आहेत. काही कुटुंबात मलिदा तर काही कुटुंबांमध्ये गुळपोळी करण्याचा प्रघात आहे. बुधवारी संक्रांतीला हे पदार्थ केले जातील. त्यासाठी बाजारात गुळ, फुटाणे यांचीही खरेदी झाली. दरम्यान, गतवषीच्या तुलनेत तिळाचा दर वाढला आहे.









