कपिलेश्वर मंदिर येथे नागप्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी
बेळगाव / प्रतिनिधी
शहर परिसरात नागपंचमी उत्साहात साजरी झाली. घरोघरी नागप्रतिमा आणून त्याची विधिवत पूजा करण्यात आली. बाजारपेठेत नागाच्या रंगीतमूर्ती तसेच केवळ मातीच्या पर्यावरणपूरक मूर्ती विक्रीसाठी आणण्यात आल्या होत्या. त्या मूर्ती अळवाच्या पानावरून घरात आणण्यात आल्या. त्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारासमोर नागाच्या रांगोळय़ा रेखाटण्यात आल्या होत्या.
नागाला फुले, पत्री घालून दूध, लाहय़ा व तंबीट याचा नैवेद्य दाखविण्यात आला. यानिमित्ताने बाजारपेठेत फुले, पत्री, केवडा यांची आवक वाढली होती. याशिवाय अळू, हळदीची पाने यांची खरेदीही झाली. घरोघरी पंचमीच्या फराळाबरोबरच दुपारी पातोळय़ा, दिवशी हे पदार्थ तयार करण्यात आले. कपिलेश्वर मंदिर येथील नाग प्रतिमांचे दर्शन घेण्यासाठीसुद्धा भाविकांनी व प्रामुख्याने महिलांनी गर्दी केली होती.
पंचमी दिवशी श्रावण शुक्रवार होता. त्यामुळे श्रावणातली गौरसुद्धा स्थापन करण्यात आली. बाजारपेठेत गौरीचे मुखवटे, फेटे, फुले, दागदागिने आले असून, महिलांनी हौसेने त्याची खरेदी केली.









