मंदिरांतून सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी, मूर्तींवर फुलांची आरास, मास्क-सॅनिटायझर वापरून मंदिरांत प्रवेश
प्रतिनिधी /बेळगाव
शहर परिसरात मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी उत्साहात साजरी झाली. यानिमित्ताने गणेश मंदिरांतून सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दरम्यान गणेश मंदिरांतून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवाय गणेश मंदिरांतून खास मूर्तींवर फुलांची आरास करण्यात आली होती.
विशेष करून बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील मिलिटरी विनायक मंदिर व चन्नम्मा सर्कल येथील गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. यासह शहर व उपनगरातील मंदिरांतून भाविकांची वर्दळ वाढली होती. प्रशासनाने कोरोनामुळे बऱयाच काळासाठी बंद असलेली मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मंदिरे भाविकांनी पुन्हा एकदा फुलली. दरम्यान खबरदारी म्हणून मास्क व सॅनिटायझर घेतल्याशिवाय मंदिरांत प्रवेश करू नका, अशा सूचना मंदिरांच्या प्रवेशद्वारावर केल्या जात होत्या. तसेच कोरोना नियमांचे पालन करून भाविकांना सामाजिक अंतर राखून मंदिरात प्रवेश दिला जात होता.
श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात अंगारकी

श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर यांच्यावतीने गणेश मंदिरात अंगारकी संकष्टी साजरी करण्यात आली. मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, दौलत साळुंखे व राजू भातकांडे यांच्या हस्ते अभिषेक व महाआरती झाली. पौरोहित्य नागराज कट्टी यांनी केले. सायंकाळी आठ वाजता महाआरती करण्यात आली. याप्रसंगी ट्रस्टी अभिजीत चव्हाण, राहुल कुरणे, विवेक पाटील आदी सेवेकरी, ट्रस्टी, भाविक उपस्थित होते.
रिद्धीसिद्धी गणपती मंदिर

बाजार गल्ली वडगाव येथील रिद्धी सिद्धी गणपती मंदिरात अंगारकी संकष्टी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने रूद्राभिषेक करून षोड्शोपचारे पूजन करण्यात आले. पुजारी बद्रिनाथ कुलकर्णी यांनी दुर्वांचा हार अर्पण केला. महाआरती करून मोदकांचा नैवेद्य दाखविण्यात आला. भाविकांनी दर्शन घेऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.
पावसाचा अडसर
मागील दोन दिवसांपासून अधून-मधून पाऊस येत आहे. मंगळवारी अंगारकी संकष्टीदिवशी देखील अधून-मधून पावसाच्या सरी येत होत्या. त्यामुळे गणेश मंदिरांकडे दर्शनासाठी जाणाऱया भाविकांना पावसाचा अडसर निर्माण झाला.









