संकष्टी चतुर्थीनिमित्त गणेश मंदिरांतून गर्दी
बेळगाव : / प्रतिनिधी
साधारण अडीच महिने बंद असलेली मंदिरे सोमवारपासून खुली करण्यात आली. त्यामुळे शहर परिसरातील मंदिरांतून दर्शनासाठी भक्तांची वर्दळ वाढली. राज्य सरकारने सर्व मंदिरे खुली करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, काही नियम व अटी पाळूनच भक्तांना दर्शन घ्यावे लागत आहे. सोमवारी संकष्टी चतुर्थी असल्याने विशेषकरून शहर परिसरातील गणेश मंदिरांतून दर्शनासाठी गर्दी झाली होती.
पूजेसाठी वापरल्या जाणाऱया हार, फुले, नारळ, अगरबत्ती मंदिरात घेऊन जाण्याला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भक्तांना केवळ दर्शन घेऊन माघारी परतावे लागले. दर्शन झाल्यानंतर मंदिरात अधिक थांबण्यास बंदी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यांपासून मंदिरे बंद असल्याने अनेक जणांना घरीच पूजन करावे लागले. काही जण रोज मंदिरात दर्शन घेऊन आपल्या कामाला सुरुवात करतात. अशांना लॉकडाऊन काळात अडचणी निर्माण झाल्या. मात्र, सोमवारपासून मंदिरे खुली झाल्याने भक्तांना सुरळीत दर्शन घेता आले. यावेळी भक्तांनीदेखील कोरोना लवकरात लवकर हद्दपार व्हावा असे साकडे घातले. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱया कपिलेश्वर मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांनी हजेरी लावली होती. त्यामुळे मंदिर परिसर बऱयाच दिवसांनी नागरिकांनी फुलला होता. दरम्यान, प्रवेशद्वाजवळ भाविकांचे थर्मल स्क्रिनिंग करून मंदिरात प्रवेश दिला जात होता.
बऱयाच दिवसांपासून मंदिरे बंद होती. या काळात भक्तांना सण, उत्सवादरम्यानही देवदेवतांच्या दर्शनापासून लांब राहावे लागले होते. त्यामुळे रोज मंदिरात जाणाऱया भक्तांच्या भक्तीमध्ये खंड पडला होता. मात्र, आता मंदिरे खुली करण्यात आल्याने दर्शन घेणे सुरळीत झाले आहे. शहरातील परिसरातील सर्व मंदिरांसह गणेश मंदिरांतून दर्शनासाठी भक्तांची वर्दळ वाढलेली पाहायला मिळाली.









