बेळगाव / प्रतिनिधी
कोरोनाच्या धास्तीने संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक सेवा मिळविण्यासाठीच घराबाहेर पडावे लागत आहे. परंतु शहरातील अनेक एटीएममध्ये खडखडाट आहे. त्यामुळे चलन मिळविण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पोलिसांना चकवा देत पैशांसाठी पायपीट करावी लागत आहे.
लॉकडाऊनमुळे पैसे मिळण्यासाठी एटीएम हा एकमेव पर्याय आहे. परंतु हा पर्यायही आता डोकेदुखीचा ठरत आहे. शहर व परिसरातील बऱयाच एटीएममध्ये चलन नसल्याने ती शटडाऊन करण्याची वेळ आली आहे. हॉस्पिटल, मेडिकलला जाताना पैसे मिळविण्यासाठी एटीएममध्ये नागरिक जात आहेत. परंतु तेथे ‘नो कॅश’चे बोर्ड लावण्यात आले आहेत. यामुळे पैसे कोठून मिळवायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आधीच पोलिसांना तोंड देत बाहेर पडावे लागत असताना एटीएम बंद असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
एटीएममध्ये पैसे भरण्याची जबाबदारी कंपन्यांकडे देण्यात आलेली असते. परंतु संबंधित कंपन्यांकडून पैसे भरले जात नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे बँकांच्या अधिकाऱयांनी पुढाकार घेऊन ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी एटीएम पूर्ववत सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.