प्रतिनिधी / बेळगाव
शहर परिसरात मंगळवारी रात्री अकराच्या दरम्यान विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. यावेळी जोरदार वाराही सुटला होता. या पावसामुळे काही काळ हवेत गारवा निर्माण झाला. गेल्या चार दिवसांपासून उष्म्यात प्रचंड वाढ होऊन नागरिक हैराण झाले होते. पावसामुळे काही प्रमाणात गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना किंचित दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून उष्म्यात वाढ झाली होती. मंगळवारी सकाळपासूनच प्रचंड उष्मा जाणवत होता. सायंकाळी पाऊस होईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत होती. मात्र, रात्री अकराच्या दरम्यान विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पावसास प्रारंभ झाला. यावेळी जोरदार वारा सुटला होता. दरम्यान शहर परिसरात काही ठिकाणी बराच वेळ वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे नागरिकांना अंधारातच बसावे लागल्याने त्यांची गैरसोय झाली. तालुक्याच्या काही भागातही पाऊस झाला आहे.
तालुक्यातही जोरदार हजेरी
तालुक्यात मंगळवारी रात्री वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. सर्रास भागात रात्री 11 नंतर मुसळधार पाऊस झाला. या पावसाने मळणीसाठी काढून ठेवलेली जोंधळय़ाची कणसे पूर्णतः भिजून शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा एक-दीड महिन्यापासून वारंवार तालुक्यात वळीव पाऊस हजेरी लावत असल्याने बळीराजाला याचा फटका बसत आहे.









