स्थानिक प्रवाशांची सोय : स्वतंत्र प्लॅटफॉर्म उभारल्याने प्रवाशांचा प्रश्न मार्गी
प्रतिनिधी / बेळगाव
शहर आणि ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज केलेले प्लॅटफॉर्म वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. त्यामुळे बसस्थानकातील ताण कमी होणार आहे. लांब पल्ल्यासाठी आणि स्थानिक बसेससाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उभारण्यात आल्याने प्रवाशांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
स्मार्ट बसस्थानकाच्या विकासकामासाठी बसस्थानकात तात्पुरती प्लॅटफॉर्मची उभारणी केली होती. दरम्यान, स्मार्ट बसस्थानकात बससेवा सुरू करून तात्पुरत्या प्लॅटफॉर्मची दुरुस्ती करून काँक्रिटीकरण केले आहे. या
प्लॅटफॉर्ममध्ये आता बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना सोयीस्कर होत आहे. शहर आणि ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एकाच ठिकाणी प्लॅटफॉर्म उभारला गेला आहे. त्याबरोबरच लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी स्वतंत्र फलाट उभारला आहे. त्यामुळे प्रवाशांना बस शोधणे आणि प्रवास करणे सोयीस्कर होत आहे.
स्वतंत्र प्लॅटफॉर्मची उभारणी
स्मार्ट सिटीअंतर्गत सुसज्ज बसस्थानक उभारले जात आहे. मध्यवर्ती बसस्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, उद्घाटनापूर्वीच या बसस्थानकातून बससेवा सुरू झाली आहे. त्यामुळे या ठिकाणाहून स्थानिक बसेस सेवा देत होत्या. त्या बसेससाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उभारला आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी शहर आणि ग्रामीण भागातील बस लागणार आहेत. बसस्थानकात प्रवाशांसाठी तीन ठिकाणी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उभारून वाहतूक सेवा पुरविली जात आहे.
एका ठिकाणी शहर आणि ग्रामीण भागातील बसेस थांबतात. एका प्लॅटफॉर्मवर चिकोडी, निपाणी, बैलहोंगल भागातील बसेस लागतात. दुसऱया प्लॅटफॉर्मवर मुंबई, बेंगळूर, धारवाड, हुबळी आदी बसेस थांबविल्या जातात.
प्रवाशांना गैरसोयींचाही सामना
मागील 6 वर्षांपासून स्मार्ट बसस्थानकाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, अद्याप पूर्णत्वाकडे गेले नाही. त्यामुळे बसस्थानकात तीन ठिकाणी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उभारून बससेवा पुरविली जात आहे. त्याबरोबर अद्याप शौचालय आणि पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
नव्याने उभारलेल्या प्लॅटफॉर्मचे सपाटीकरण करून काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. शिवाय प्रवाशांना हा प्लॅटफॉर्म खुला करण्यात आला आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील बसेस या ठिकाणी थांबणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना एका बसमधून दुसऱया बसमध्ये जाता येणार आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी प्रवास करणे सोयीस्कर होणार आहे.
सीबीटी बसस्थानकाचे कामही सुरू झाले आहे. दुसरा मजला संपवून तिसऱया मजल्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी तळमजल्यात भव्य असे पार्किंग उभारण्यात आले आहे. त्यामुळे दुचाकी, चार चाकी वाहनधारकांची सोय होणार आहे.









