प्रतिनिधी/ बेळगाव
संपूर्ण देशात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. मात्र शहरातलगत असलेल्या ग्राम पंचायत हद्दीतील उपनगरात स्वच्छतेकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. शहराभोवती असलेल्या विविध उपनगरांमधील रस्त्याशेजारी कचऱयाचे ढिगारे साचत असून स्वच्छता करण्याकडे ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शहरात येणाऱया नागरिकांचे स्वागत दुर्गंधीने होत आहे.
शहरालगत असलेल्या वसाहतीमध्यील स्वच्छतेच्या समस्या जैसे थे असून याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. महापालिका हद्दीलगत बेनकनहळळी ग्राम पंचायत हद्दीतील सरस्वती नगर, हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील डिफेन्स कॉलनी, कंग्राळी ग्राम पंचायत हद्दीमध्ये येणारे रामनगर, पिरनवाडी ग्राम पंचायत हद्दीतील ब्रम्हनगर, पिरनवाडी अशी असंख्य उपनगरे आहेत. ग्राम पंचायतीकडे निधी नसल्याने उपनगरांचा विकास करण्यात अपयश आले आहे. विशेषत: शहरापासून जवळच असलेल्या सरस्वती नगरमध्ये आणि डिफेन्स कॉलनीमध्ये कचऱयाचे ढिगारे आणि गटारीअभावी सांडपाणी साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लक्ष्मी टेकडी येथे जलशुद्धीकरण केद्र असून येथून जवळच असलेल्या सरस्वतीनगर परिसरात कचऱयाचे ढिगारे साचले आहेत. सरस्वतीनगरचा परिसर बेनकनहळळी ग्राम पंचायत हद्दीमध्ये येतो. मात्र येथील स्वातंत्र्ययोद्धा कॉलनीचा विकास बुडाने केला असून याची देखभाल बुडाच्यावतीने करण्यात येते. यामुळे बुडा आणि ग्राम पंचायत यांच्या हद्दीच्या वादात समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. येथील कचऱयाची उचल केली जात नसल्याने ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचले आहेत.
डिफेन्स कॉलनीचा परिसर हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीत येतो. मात्र बेनकनहळळी ग्राम पंचायत हद्दीतील पार्वती लेआऊट, गणेशपूर अशा विविध परिसरातील कचरा रामघाट रोडवर डिफेन्स कॉलनी परिसरात टाकण्यात येतो. त्यामुळे कचऱयाची उचल कोण करणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे याठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तसेच बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर विजयनगर परिसरात रस्त्याशेजारी कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच सांबरा रेड, कणबर्गी रोड, खानापूर रोड अशा विविध रस्त्याशेजारी कचरा टाकण्यात येत असून संबंधित ग्राम पंचायत, तालुका व जिल्हा पंचायतीच्या अधिकाऱयांनी याकडे कानाडोळा केला आहे. हिंडलगा आणि डिफेन्स परिसरातील कचऱयाच्या समस्येबाबत येथील नागरिक जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र के.व्ही. यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे..









