पायाभूत सुविधा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांची एल ऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील पाणीपुरवठा नियोजन पूर्णपणे कोलमडले असून एल ऍण्ड टी कंपनीच्या कारभारामुळे संपूर्ण शहरवासीय वैतागले आहेत. तक्रार करण्यासाठीदेखील अधिकारी नसल्याने समस्या कोणाकडे मांडायची असा मुद्दा उपस्थित झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पण या समस्येचे निवारण करण्याच्या दृष्टीने एल ऍण्ड टी आणि पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांची बैठक घेऊन सुरळीत पाणीपुरवठा करण्याची सूचना केल्याची माहिती पायाभूत सुविधा विभागाचे अधीक्षक अभियंते प्रभाकर सेट यांनी दिली.
शहरात 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्याचा प्रस्ताव मार्गी लावण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ाची जबाबदारी एल ऍण्ड टी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. जुलै महिन्यापासून शहराच्या पाणीपुरवठय़ाचे नियोजन कंपनीकडून करण्यात येते. पण व्यवस्थित आणि वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. राकसकोप जलाशय, पंपिंग स्टेशन, जलशुद्धीकरण केंद्र आणि व्हॉल्वमेन म्हणून कार्यरत असलेले कामगार पूर्वीचेच आहेत. केवळ व्यवस्थापन करणारे अभियंते एल ऍण्ड टी कंपनीचे आहेत. तरीदेखील शहरातील पाणीपुरवठा नियोजनाचा बोजवारा उडाला असून शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. काही भागात 10 ते 15 दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्याने शहरवासियांचे हाल होत आहेत. तसेच कूपनलिका आणि विहिरींद्वारे पाणीपुरवठा करणारे विद्युतपंप नादुरुस्त असून दुरुस्ती करण्याकडे कंपनीच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. पाण्यासंदर्भात तक्रारी ऐकून घेण्यासाठीही जबाबदार अधिकारी नियुक्त करण्यात आला नसल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे.
कामगार जुनेच असताना समस्या का?
चोवीस तास पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करणाऱया पायाभूत सुविधा विभागाच्या देखरेखीखाली एल ऍण्ड टी कंपनीचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा खात्याच्या अधीक्षक अभियंत्यांनी पाणीपुरवठा मंडळ व एल ऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱयांची संयुक्त बैठक सोमवारी घेतली.
शहरातील पाणीपुरवठा नियोजनात निर्माण झालेल्या अडचणींची माहिती यावेळी जाणून घेतली. कामगार जुनेच असताना ही समस्या का आहे? असा प्रश्न अधिकाऱयांना विचारला असता विद्युतपुरवठा सुरळीत नसल्याचे सांगण्यात आले. दुरुस्ती किंवा भारनियमनावेळी पाणीपुरवठा मंडळाकडून शहरात पाणीपुरवठा नियोजनाचे कामकाज कसे हाताळण्यात येत होते, याची माहिती त्यांनी पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांकडून जाणून घेतली. तसेच शहरवासियांना पाणी समस्या निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना अधिकाऱयांना केली. दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशा विविध सूचना एल ऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱयांना केल्या असल्याचे अधीक्षक अभियंते प्रभाकर सेठ यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.









