उद्योगधंदे सुरू झाल्याने विजेच्या मागणीत वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
लॉकडाऊननंतर हळूहळू सर्व उद्योगधंदे पूर्वपदावर येऊ लागले आहेत. बेळगावातील औद्योगिक वसाहतदेखील हळूहळू पूर्ववत झाली आहे. यामुळे शहरातील विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या शहराला दररोज सुमारे 100 मेगावॅट विजेची गरज लागत आहे. विजेची मागणी व पुरवठा योग्य असल्याने भारनियमनाचा कोणताही फटका यावषी बसणार नाही.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे शहरातील कारखान्यांसोबतच इतर व्यवसायही दीड ते दोन महिने पूर्णपणे ठप्प होते. या काळात दररोज 50 ते 60 मेगावॅट वीज लागत होती. उद्योगधंदे बंद असल्याने विजेचा वापर कमी झाला होता. यामुळे विजेचा वापर निम्म्यावर पोहोचला होता.
लॉकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर उद्योगधंदे पुन्हा एकदा सुरू झाले. त्याचसोबत विजेची मागणीही हळूहळू वाढू लागली. नोव्हेंबर -डिसेंबर महिन्यात विजेची मागणी 80 ते 85 मेगावॅटपर्यंत वाढली होती. ती आता हळूहळू 100 मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. मार्चअखेर दररोज 95 ते 100 मेगावॅट इतकी विजेची गरज शहराला भासू लागली आहे.
व्यवसाय पूर्ववत सुरू झाल्याने विजेची मागणी वाढली
सध्या बेळगाव शहराला सुमारे 100 मेगावॅट वीज लागत आहे. औद्योगिक कारखाने, इतर व्यवसाय हे पूर्ववत सुरू झाल्याने विजेची मागणी वाढली आहे. लॉकडाऊनमध्ये विजेची मागणी 50 ते 60 मेगावॅटपर्यंत खाली घसरल्याची माहिती शहर कार्यकारी अभियंते एम. टी. अप्पण्णावर यांनी दिली.









