सातारा / प्रतिनिधी :
कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसतानाच शहरात हिवतापाच्या रूग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील लहान-मोठ्या दवाखान्यांमध्ये अधिक प्रमाणात नागरिक तपासणीला दाखल होत असल्याचे दिसत आहे. त्यातच सध्या डेग्यू, चिकनगुनिया सारख्या साथीच्या रोगांनीही डोके वर काढल्याने याच्या रूग्णांमध्ये ही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. याबाबत आरोग्य विभागातर्फे शहर परिसरात जनजागृती करण्यात येत आहे. हिवताप अधिकारी अश्विनी जंगम यांनीही डेंग्यूचे रूग्ण आढळणाऱ्या भागाची पाहणी केली.
आता नव्याने ‘झिका’ व्हायरसचा घोका वाढला आहे. या नव्या विषाणूसाठी आरोग्य विभाग सतर्क झाला असून, डासांपासून होणाऱ्या या विषाणूचे रूग्ण सध्या पुणे जिल्हय़ात आढळल्याने आरोग्य विभागाने सतर्कतेच्या दृष्टीने आत्तापासूनच पावले उचलली आहेत. त्याकरीता नागरिकांनाही आपल्या घराची आणि परिसराची स्वच्छता राखण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे. जेणे करून या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये.
पालिकेने स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजचे
सध्या कोरोनाचा कहर सुरू असताना झिका, डेंग्यू, चिकनगुनीया, हिवताप सारख्या आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे अस्वच्छतता. सध्या शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढिग साठलेले दिसत आहेत. याची योग्य वेळेत उचल होणे गरजेचे होणे आहे. त्यामुळे पालिकेनेही याकडे गांभिर्याने लक्ष देणे गरजचे आहे.









