प्रतिनिधी/ बेळगाव
शहर परिसरात गुरुवारी अत्यंत साधेपणाने रामनवमी साजरी झाली. नागरिकांनी आपल्या घरी श्रीरामाची प्रतिमा ठेवून भक्तिभावाने पूजा केली. नेहमी रामजन्म दुपारी 12.30 च्या दरम्यान साजरा केला जातो. त्यानुसार 12.30 वाजता रामाचा गजर करून आरती म्हणण्यात आली. मंदिरांमध्ये ज्या मंदिर चालकांना शक्मय होते त्यांनी सकाळी साधेपणाने पूजा करून प्रसाद दाखविला.
बेळगावमध्ये रामनवमीचा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येतो. शहरातील सर्व राम मंदिरांमध्ये गर्दी असते. विविध ठिकाणी प्रवचन, कीर्तनाचे आयोजन केले जाते. परंतु लॉकडाऊनमुळे गर्दी टाळणे हिताचे हे लक्षात घेऊन रामनवमी साधेपणाने साजरी झाली. अर्थात तुमची प्रार्थना महत्त्वाची हे पुरोहितांचे मत लक्षात घेऊन प्रत्येक भाविकांनी कोरोनाचे संकट टळावे, अशी प्रार्थना मनोमन केली.
टिळकवाडी येथील डॉ. अभिजित गोगटे यांच्या घरी असणाऱया राम मंदिराचा उत्सव दरवषी विशेष पूजाअर्चा करून होतो. या पूजेसाठी परिसरातील भाविक दरवषी हजेरी लावतात. मात्र यंदा डॉ. अभिजित यांचे सुपुत्र अद्वैत आणि अभिषेक यांनी सामाजिक अंतर ठेवून पूजा केली. विशेष म्हणजे त्यांना गुरुजींनी ऑनलाईन पूजा करण्याचा विधी कथन केला. कुटुंबातील पाच सदस्यांनी सामाजिक अंतर ठेवून आरती केली.
रामदेव गल्ली
रामदेव गल्ली येथील राम मंदिरातर्फे पुरोहित प्रमोद दप्तरदार यांनी आपल्या निवासस्थानी पहाटेच रामनवमीनिमित्त अभिषेक केला. तसेच गणपती पूजन केले आणि संपूर्ण विश्वाला हैराण केलेल्या कोरोनाचे निवारण होऊन सर्वांना उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना केली. दरवषी पहाटे 5 वाजता ते राम आणि गणपतींना अभिषेक करत असतं. परंतु यंदा लॉकडाऊनमुळे त्यांनी हे धार्मिक विधी घरी केले. आरती करून प्रसाद आणि पंचामृत देण्यात आले.
9 दिवे लावून श्रीरामांना सर्वांनी घातले साकडे
श्रीराम जन्मोत्सव समिती सेलुच्या प्रेरणेतून शहर परिसरात अनेकांनी सायंकाळी 7 वाजता आपल्या घराबाहेर 9 दिवे लावले. कोरोनाच्या महाभयंकर संकटात अडकलेल्या आपल्या देशाला सुखरुपपणे बाहेर पडण्यासाठी, सर्वांना वाचविण्यासाठी शर्थ करत असलेले डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छतादूत, पोलीस यंत्रणा यांच्या दीर्घायुष्यासाठी श्रीरामांना सर्वांनी साकडे घातले.









