प्रतिनिधी /बेळगाव
शहराचा पाणीपुरवठा दहा दिवस बंद होता. पण अलीकडेच पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. मात्र, शहर आणि उपनगरांमधील नळांना शुद्धीकरण करण्यापूर्वीच दूषित पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पाणी दूषित असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
पावसामुळे राकसकोप जलाशयातील पाण्याची पातळी वाढल्याने अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीपात्रात सोडण्यात आले होते. त्यामुळे पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे शहरात दहा दिवस पाणीपुरवठा झाला नाही. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. तब्बल दहा दिवसांनंतर काही भागात पाणीपुरवठा करण्यात आला आहे. पण बहुतांश परिसरात नळांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विशेषतः वडगाव, अनगोळ, टिळकवाडी, भाग्यनगर आदींसह शहराच्या विविध भागात नळांना गढूळ पाणी येत आहे. राकसकोप जलाशयाबरोबर नळांनाही दूषित पाणी येण्यास प्रारंभ झाला आहे. याबाबत नागरिकांनी पाणीपुरवठा मंडळाकडे तक्रार केली असता याची कोणतीच दखल पाणीपुरवठा मंडळाचे अधिकारी घेत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. जलशुद्धीकरणासाठी पाणीपुरवठा मंडळ मोठय़ा प्रमाणात निधी खर्च करते. पण शहरातील नळांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. राकसकोप जलाशयामधील पाणी पावसामुळे दूषित झाले असल्याचे पाणीपुरवठा मंडळाचे आधिकारी सांगत आहेत. पण हिडकल जलाशयामधील पाणीपुरवठा करण्यात येऊनही पाणी दूषित कसे, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. शहरातील विविध भागात नळांना गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. वास्तविक पाहता शुद्धीकरण करण्यात आलेल्या पाण्याला ब्लिचिंग पावडरचा थोडय़ा प्रमाणात वास येतो. पण या पाण्याला दुर्गंधी येत असल्याची टीका नागरिक करीत आहेत. राकसकोप जलाशयामधून येणारे पाणी शुद्धीकरण न करता थेट पुरवठा करण्यात येत आहे का? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.
शहरात चिकुनगुनिया, डेंग्यू, मलेरियासारख्या रोगराईचा फैलाव होत असताना पाणीपुरवठा मंडळाने दूषित पाण्याचा पुरवठा चालविला असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रोगराईचा फैलाव होत असल्याने दूषित पाणी पुरवठय़ाबाबत तक्रार करूनही याची दखल घेण्यात आली नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.









