राजारामपुरी, कसबा बावडय़ातील वृध्दांचे तीन लाखाचे सोन्याचे दागिने लंपास
कोल्हापूर प्रतिनिधी
पोलीस असल्याची बतावणी करुन राजारामपुरी आणि कसबा बावडय़ातील वृध्दांच्या अंगावरील सुमारे तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुबाडल्याची घटना बुधवारी सकाळी पाऊण तासाच्या अंतराने घडल्या.यामुळे नागरिकांध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजारामपुरी आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनांची नोंद झाली आहे.
निशा बाबूलाल मेहत्ता (वय 72 रा.रजनी टेरेसेस, राजारामपुरी 6 वी गल्ली) या सकाळी सेनापती बापट मार्गावरुन निघाल्या होत्या. 9.15 वाजण्याच्या सुमारास त्या पुरंदरे मिसळसमोर आल्या. त्यावेळी दुचाकीवरुन दोघे त्यांच्याजवळ आले. त्यापैकी एकाने हेल्मेट घातले होते. त्यांनी मेहत्ता यांना थांबवून हिंदीतून आपण पोलीस असल्याचे सांगितले. पुढे तपाससणी सुरु आहे, तुम्ही का फिरत आहे, मास्क का लावला नाही, अंगावर सोने घालून कशासाठी फिरता असे म्हणत अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगितले. यावेळी मेहत्ता यांनी 80 हजार रुपयांच्या सोन्याच्या दोन बांगडय़ा, 40 हजार रुपयांची सोन्याची पाटली आणि 70 हजार रुपयांची सोन्याची चेन काढली. यानंतर दुचाकीवरील अनोळखींनी ते दागिने घेऊन कागदात गुंडाळून हातचलाखी करुन कागद मेहत्ता यांच्या हातात देवून ते पसार झाले. काही वेळाने मेहत्ता यांनी कागद उघडून पाहिला असता त्यांना त्यामध्ये आपले दागिने नसल्याचे दिसून आले. यामुळे त्यांनी आपल्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. यानंतर राजारामपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत त्यांनी दोन अनोळखी व्यक्तीविरुध्द फिर्याद दिली असून 1 लाख 90 रुपयांचे दागिने चोरुन नेल्याचे म्हटले आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे या गुन्हय़ाचा तपास करत आहेत.
दरम्यान, पाऊण तासाच्या अंतराने सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कसबा बावडय़ातील प्रिन्स शाळेजवळ अशाच प्रकारची घटना घडली आहे. सावित्री शिवाजी चव्हाण (वय 70) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस असल्याची बतावणी करुन दुचाकीवरुन आलेल्या दोघा अनोळखी व्यक्तीनी 1 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या चार पाटल्या चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या गुन्हय़ाची नोंद झाली असून पोलीस तपास करत आहेत.