प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. किरकोळ विक्रेते आणि हातगाडयाचे वाढते प्रमाण वाहतूकीस अडथळा निर्माण करत आहे. या विक्रेत्यांवर पालिका वारंवार कारवाई करत असते. मात्र या कारवाईची भीती न बाळगता लोकप्रतिनिधीची नावे पुढे करत पुन्हा मुळ ठिकाणी विक्रेते थाट मांडत आहेत. या विक्रेत्यासाठी पालिकेने वेंडर सर्व्हे सुरू केला आहे. तसेच पाच ठिकाणी हॉकर्स झोन तयार करण्यात आले आहेत.
सातारा शहर हे अनेक वर्षापासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. एसटी स्टॅड परिसर, पोवईनाका, गोडोली, सदरबझार, जिल्हा परिषद, मोती चौक, राजवाडा मंगळवार तळे या भागात फुटपाथवर वडापाव, फळविक्रेते यांनी हातगाडे उभे केले आहेत. यामुळे पालिकेने हजारो रूपये खर्च करून तयार केलेला फुटपाथवरून पाद्चारी चालताना दिसत नाहीत. तसेच फुटपाथवरचे अतिक्रमण रस्त्यावर आले आहे. शहरात सणासाठी लागणारे साहित्य विक्री करणारे किरकोळ विक्रेते यांना जागा नसल्याने ते रस्त्यालगत बसत आहेत. आज साजरी होणाऱया संक्रांत सणासाठी बाजारपेठेत विक्रीसाठी साहित्य आले आहेत. यामध्ये पुजेचे साहित्य, संक्रांत, तिळगुळ, वाण आशा साहित्यांची विक्री सर्वत्र होताना दिसत आहे. पोवईनाक्यावरील ग्रेड सेपरेटरच्या स्लॅबवर, कासट मार्केट, एसटी स्टॅड, तसेच मोतीचौक, गोल बाग या ठिकाणी किरकोळ विक्रेते बसले आहेत. यांच्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. गेल्या चार-पाच दिवसापासून शहरात कोंडीचे प्रमाण वाढले आहे. या विक्रेत्यांवर पालिका तसेच वाहतूक पोलीस यांची वारंवार कारवाई सुरू असते. मात्र या कारवाईकडे दुर्लक्ष करत विक्रेत्यांचा मनमानी कारभार वाढत आहे. पालिकेच्या कर्मचाऱयांना लोकप्रतिनिधीची नावे पुढे करत दम भरला जातो. आणि अतिक्रमण हटाव मोहीम थंड केली जाते. ग्रेड सेपरेटरचे काम युद्धपातळीवर सुरू असून खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकामामुळे वाहतूकीवर ताण वाढत असताना या विक्रेत्यांकडून यात भर टाकण्याचे काम वारंवार करण्यात येत आहे.
शहरात पाच ठिकाणी जागा…
शहरात जागा दिसेल तिथे विक्रेते अतिक्रमण करत आहेत. हे विक्रेते दररोज पालिकेला जागेचे भाडे देत असतात. हातगाडे विपेत्यांकडून दिवसाला 24 रूपये आकारले जातात. तर रस्त्यावर बसणाऱया विक्रेत्यांकडून 12 रूपये आकारले जातात. या विक्रेतांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी सातारा पालिकेने शहरात पाच ठिकाण निश्चित केली आहेत. यामध्ये पहिली जागा तहसिलदार कार्यालयाच्या पाठीमागे आहे. पालिकेने लाखो रूपये खर्च करून रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. तसेच पथदिवेही बसवण्यात आले आहेत. विक्रेत्यासाठी पाण्याची सोय उपलब्ध आहे. या ठिकाणी हॉकर्स झोन क्षमता 540 आहे. या ठिकाणी स्थलांतर करताना हॉकर्स संघटनाच्यात जागेवरून वारंवार वाद निर्माण होत आहे. स्वता:सह नातेवाईक यांची नावे पुढे करत जागा मिळवण्यासाठी प्रयत्न होत आहे. छत्रपती प्रतापसिंह थोरले महाराज भाजी मंडई येथे जागा उपलब्ध आहेत. सदाशिव पेठेतील जुनी भाजी मंडई, महात्मा फुले पुर्व-पश्चिम रस्ता, जिल्हा परिषद सर्किट हाऊस केबीपी कॉलेच्या मागील रस्ता अशी पाच ठिकाणी हॉकर्स झोन तयार करण्यात आले आल्याची माहिती पालिकेचे उपमुख्याधिकारी धुमाळ यांनी दिली.
पालिकेचा सर्व्हे सुरू…
शहरात विक्रेत्यांचे अतिक्रमण कमी करण्यासाठी सातारा नगरपरिषदेच्या वतीने वेंडर कमिटीचा सर्व्हे सुरू आहे. या सर्व्हेच्या माध्यामातून पथविक्रेत्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. अध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. या समितीत 21 सदस्य असणार आहेत. पालिकेचे मुख्याधिकारी, पोलीस निरिक्षक, वाहतूक शाखा निरिक्षक, नगर रचनाकार, अशासकीय अधिकारी, पथविक्रेते, बॅकेतील अधिकारी, डॉक्टर अशी एकून 21 सदस्य असणार आहेत.









