रविवारचा बाजार असल्याने खरेदीदार-विपेत्यांची झुंबड : कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर, दक्षता घेण्याकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
विकेंड कर्फ्यू मागे घेतल्यानंतरही शहरात गर्दी झाली नाही, मात्र खासबागच्या बाजारामध्ये मोठी झुंबड उडाली होती. शहरासह ग्रामीण भागातील जनता मोठय़ा संख्येने खरेदीसाठी आली होती. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसविल्याचे दिसून आले. सध्या या परिसरात गाळे उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर अडचण झाली आहे. त्यातच विपेत्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले होते. त्यामुळे खरेदीदारही रस्त्यावर उभे राहून खरेदी करताना दिसत होते. या बाजाराला जणू यात्रेचे स्वरुपच आल्याचे रविवारी दिसून आले.
रुग्णसंख्या दिवसागणिक वाढती
कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यामुळे सरकारने वेगवेगळे निर्बंध लादले आहेत. मात्र, जनतेला तसेच व्यावसायिकांना त्रास होऊ नये यासाठी विकेंड कर्फ्यू मागे घेतला. त्यानंतर आता बाजारामध्ये गर्दी होताना दिसत आहे. रविवारी सुटीचा वार असला तरी शहराकडे मात्र साऱयांनीच पाठ फिरविल्याचे दिसून आले. दुकाने तसेच इतर व्यवहार सुरू होते. मात्र, ग्राहकांची संख्या कमी होती. याउलट खासबाग आणि शहापूरमध्ये मात्र गर्दी असल्याचे चित्र पहायला मिळाले.
खासबागच्या बाजारामध्ये ग्रामीण भागातून मोठय़ा प्रमाणात विपेते येतात. याचबरोबर शहरातील विपेतेही त्या बाजाराकडे वळले जातात. आठवडाभराची खरेदी करण्यासाठी शहरातील उपनगर तसेच ग्रामीण भागातील जनता खासबागच्या बाजारपेठेत आवर्जून खरेदीसाठी येत असते. भाजीपाल्यासह इतर वस्तू खरेदीसाठी गर्दी नेहमीच करत असतात. तसेच कोरोना काळात तरी याचे प्रत्येक नागरिकाला भान असायला पाहिजे होते. मात्र, विनामास्क आणि सोशल डिस्टन्स न ठेवताच नागरिक खरेदी करताना दिसून येत होते. त्यामुळे अनेकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
हवे तसे वागणे अयोग्य
कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बेळगाव जिल्हय़ाचा आकडा आता पाच हजारावर गेला आहे. या कोरोनाला प्रतिबंध करायचा असेल तर गर्दी टाळणे हा मोठा उपाय आहे. असे असताना कोणालाच त्याची काळजी नसल्याचे दिसून आले. सरकारने मुभा दिली म्हणून हवे तसे वागणे हे योग्य नाही, अशा प्रतिक्रिया उमटत होत्या. कोरोना हा आजार संसर्गजन्य आहे. एकापासून दुसऱयाला होणारा आजार असल्यामुळे त्याचे भान प्रत्येकालाच असणे गरजेचे आहे. पण या बाजारपेठेत रविवारी याबाबत कोणतीच दक्षता किंवा काळजी घेतली नसल्याचे दिसून आले.









