प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांमधील लॉजना भेटी देऊन पोलीस अधिकाऱयांनी तपासणी केली. शनिवारी रात्री सुमारे 50 पथकांनी वेगवेगळय़ा लॉजमध्ये जाऊन तपासणी केली. अचानक केलेल्या या कारवाईमुळे लॉजमालकांमध्ये खळबळ माजली आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर लॉज तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली होती. लॉजचालक व मालकांना अधिकाऱयांनी काही सक्त सूचना केल्या आहेत. प्रत्येक लॉजमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे सक्तीचे आहे. लॉजमध्ये येणाऱया ग्राहकांकडून त्यांचे ओळखपत्र घेऊनच त्यांना खोली द्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.
जर संशयास्पद व्यक्ती दिसून आली तर तातडीने जवळच्या पोलीस स्थानकाला माहिती द्यावी. लॉजमध्ये बेकायदेशीर कृत्ये होऊ नयेत, यासाठी खबरदारी घ्यावी, अशी सूचना पोलीस अधिकाऱयांनी केली. ही तपासणी यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.









