प्रवेशद्वारावर पोलीस कर्मचारी तैनात
प्रतिनिधी /बेळगाव
हिजाब प्रकरणावरून उद्भवलेल्या वादंगानंतर शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. महाविद्यालयांच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालयांमध्ये हिजाब विरुद्ध भगवा असा संघर्ष पेटला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महाविद्यालयांसह माध्यमिक विद्यालयांना तीन दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे. दक्षतेचा उपाय म्हणून बुधवारी बेळगाव शहरासह जिल्हय़ातील महाविद्यालयांत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
महाविद्यालयात प्रवेश करणाऱया प्रत्येकाची चौकशी केली जात होती. शिक्षणेत्तर कर्मचाऱयांना काही प्रमाणात बुधवारी पाचारण करण्यात आले होते. पण त्यांनाही पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागले. विद्यार्थी संघटनांनी बंद काळातही निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने हा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुरुवारीदेखील बंदोबस्त कायम राहणार आहे.









