प्रतिनिधी/ सातारा
शहरातील शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका व जुगारावर होणाऱया पोकळ कारवाईमुळे हा व्यवसाय तेजीत सुरू होता. यावर ठोस कारवाई होत नसल्याने याला आळा बसणार कधी ? अशी मालिका ‘तरूण भारत’ने प्रसिद्ध केली होती. या मालिकेमुळे अनेक अवैध व्यवसाय करणाऱयांचे धाबे दणाणले होते. ‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल घेऊन व्यवसाय मोडीत काढण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी ही ठोस भूमिका घेत शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 4 जणांना तडीपार केले आहे.
शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी मटका, जुगार टोळीचा प्रमुख यासीन इक्बाल शेख (वय 38, रा. गुरूवाज पेठ सातारा), सदस्य इनायत मोहम्मदआली शेख (वय 47, रा. गुरूवार पेठ सातारा), राजन अशोक सांडगे(वय 26, रा. मंगळवार पेठ सातारा), जयसिंग हणमंत भोसले (वय 65, रा. केसरकरपेठ सातारा) यांचा तडीपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावानुसार या चौघांना सातारा जिह्यातून 6 महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही टोळी बेकायदेशीर मटका व जुगार चालवत होती. वेळोवेळी गुन्हे दाखल करून सुधारण्याची संधीही देण्यात आली परंतु सुधारणा झाली नाही. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. पोलीस अधीक्षक बन्सल यांनी जिह्याचा कार्यभार स्विकारल्यापासून 29 प्रस्तावातील बेकायदेशीर कारवाया करणारे 107 इसमांना हद्दपारीचे आदेश दिलेले आहेत.
तरूण भारतच्या पाठपुराव्याला यश
मटक्यावर वक्रदृष्टी कधी पडणार ? या पहिल्या भागाने सुरू झालेली मालिकेने शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या सुरू असलेल्या मटका व जुगाराच्या व्यवसायाला अवघ्या पाच दिवसात प्रकाशझोतात आणले. यामुळे पोलिसांनी कारवाईचा धडका सुरू ठेवला. तरीही यावर ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे ‘तरूण भारत’ने मालिकांमधून सडेतोड मांडले होत. यामुळे सदर चौघांवर तडीपारीसारखी कारवाई करण्यात आली आहे. अजून अशा कारवाया होणे गरजेचे असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहेत.








