आमदार चंद्रकांत जाधव यांची सूचना, शहर पाणी पुरवठा विभागात आढावा बैठकीत नागरिकांच्या समस्या,
तक्रारीवर सविस्तर चर्चा
प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरात अपुरा, कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा, काही भागात येणारे अस्वच्छ पाणी अशा अनेक तक्रारी नागरिकांतून वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी शहरातील प्रत्येक गल्लीतील घरात होणाऱया पाणी पुरवठ्याची संपूर्ण माहिती संकलित करण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रत्येक घरात कशा प्रकारे पाणी येते याचे सर्व्हेक्षण करा आणि त्यानंतर पाणी पुरवठ्याच्या यंत्रणेत आवश्यक ते बदल करा, असे निर्देशही आमदार जाधव यांनी दिले आहे.
आमदार चंद्रकांत जाधव यांनी मंगळवारी महापालिकेत शहर पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱयांबरोबर आढावा बैठक घेतली. पाणी पुरवठ्यासंदर्भात शहरातील नागरिकांकडून ज्या तक्रारी होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार जाधव यांनी पाणी पुरवठा विभागाला सूचना केल्या. यावेळी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांच्या जल अभियंता नारायण भोसले, प्रकल्प अभियंता हर्षजित घाटगे व इतर अधिकारी उपस्थित होते.
शहरातील नागरिकांना स्वच्छ, वेळापत्रकाप्रमाणे वेळेत आणि योग्य दाबाने (प्रेशरने) पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने यंत्रणा राबवा, अशी सूचना केली. बालिंगा, कळंबा, कसबा बावडा येथील पंप हाऊसच्या दुरूस्ती कामाच्या स्थितीचीही त्यांनी माहिती घेतली. पंपहाऊसची कपॅसिटी वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, शहरात 26 पाण्याच्या टाकी आहेत. त्या पूर्ण क्षमतेने भरण्यात याव्यात, त्यातूनच पाणी पुरवठा झाल्यास प्रेशरने पाणी नागरिकांना मिळेल, असे आमदार जाधव यांनी सांगितले.
गल्लीतील प्रत्येक घरात जाऊन सर्व्हेक्षण करा
आमदार जाधव यांनी शहरातील नागरिकांच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात होणाऱ्या तक्रारींची पाणी पुरवठा विभागाने गंभीर दखल घ्यावी. त्यासाठी समस्येच्या मुळापर्यंत जाऊन माहिती घेण्याची सूचना केली. शहरातील प्रत्येक भागात, गल्लीतील घरात जो पाणी पुरवठा होतो त्याचे सर्व्हेक्षण करा, पाणी येते का ?, स्वच्छ पाणी पुरवठा होतो का ?, प्रेशरने पाणी येते ?, वेळापत्रकानुसार पाणी येते काय? आदी प्रश्नांच्या आधारे सर्व्हेक्षण करा. त्याआधारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पाणी पुरवठा व्यवस्थेत, यंत्रणेत बदल करून नजिकच्या काळात नियोजन करा, अशा सूचनाही आमदार जाधव यांनी यावेळी केल्या.
पुढील बैठक आरोग्य विषयक
पाणी पुरवठ्याच्या बैठकीनंतर आता लवकरच शहरातील आरोग्य विषयक समस्यांबाबत आढावा बैठक घेण्यात असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.
बैठकीत माजी स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी आपल्या कार्यकाळात बालिंगा फिल्टर हाऊसच्या पंपिंग यंत्रणेत केलेले बदल आणि सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. शिंगणापूर, कळंबा आणि कसबा बावडा फिल्टर हाऊसमध्ये नवीन पंप बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपब्लध करून देण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने इस्टिमेट तयार करावे, अशी सूचना सचिन पाटील यांनी केली.
पाणी गळती 20 टक्क्यांवर आणा
सध्या शहरात जो पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये पाणी गळतीचे प्रमाण 40 टक्क्यांपर्यंत आहे. ते कमी करून 20 टक्क्यांपर्यंत आणण्याचे प्रयत्न करा. त्यासाठी जलवाहिन्यांमध्ये आवश्यक ते दुरूस्ती, बदल करा, त्यासाठी जो निधी लागेल. तो मिळवून देण्यासाठी राज्य शासनाच्या पातळीवर मी प्रयत्नशील राहिन, असेही जाधव यांनी सांगितले.