पावसाळय़ापूर्वीच महापालिकेने मोहीम राबविणे महत्वाचे
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील धोकादायक इमारती हटविण्यासाठी महापालिकेने मालकांना नोटीसा बजावल्या आहेत. मात्र केवळ नोटीसा बजावून त्याचा काहीच उपयोग होणार नाही. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी अशा इमारती हटविणे गरजेचे आहे. सरकारी असो किंवा खासगी धोकादायक इमारती हटविणे गरजेचे असल्याचे मत अनेकांतून व्यक्त होत आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये शहराला आणि उपनगरांना महापूराचा फटका बसू लागला आहे. तेंव्हा मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी ज्या इमारतींची मुदत संपली आहे त्या इमारती हटविणे गरजेचे आहे. मागील काही वर्षांपूर्वी शिवाजी रोडवरील धोकादायक इमारत कोसळून एक कामगार आणि तिघे जखमी झाले होते. या घटनेनंतर महापालिकेने धोकादायक इमारतीबाबत गांभीर्य घेतले नाही. शहरातील धोकादायक इमारतींची यादी तयार करण्यात आली होती. काही जणांना इमारती हटविण्यासंदर्भात नोटीसाही बजावल्या होत्या. त्यावेळी या इमारत मालकांना काही दिवसांची मुदत घेतली होती. मात्र अजूनही या धोकादायक इमारती हटविल्या नाहीत, अशा तक्रारी शेजारी करत आहेत. धोकादायक इमारती शेजारच्या इमारतीवरही कोसळण्याची भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे ज्या धोकादायक इमारतींची यादी आहे त्यानुसार आताच या इमारती हटवाव्यात, अशी मागणी होत आहे. मालकांनी जर हटविल्या नाहीत तर महापालिकेने या इमारती हटविल्या तर संबंधित मालकाला महापालिकेला खर्च द्यावा लागतो, अशी तरतूद आहे. शहरात मोठय़ा संख्येने धोकादायक इमारती आहेत. शहरातील मध्यवर्ती भागात या इमारती असून त्या इमारती हटविण्याबाबतही महापालिकेने मध्यंतरी प्रयत्न केले होते. मात्र त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तेंव्हा पावसाळयापूर्वी या धोकादायक इमारती हटवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.









