प्रतिनिधी / बेळगाव
देशातील सर्व चित्रपटगृहे 1 फेब्रुवारी 2021 पासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली असून, त्याबाबत केंद्रीय सूचना व माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटसुद्धा केले आहे. कोरोना नियंत्रणात आला असून आता चित्रपटगृह चालकांनी थिएटर सुरू करावेत. मात्र, काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. बेळगावमधील थिएटरचालक मात्र आपली चित्रपटगृहे सुरू करण्यास अद्याप राजी नाहीत. थिएटर सुरू करण्याबाबत सरकारने मार्गदर्शक प्रणाली आखून दिली आहे. त्यानुसार आलेल्या प्रेक्षकांचा मोबाईल क्रमांक घ्यावा, असेही सांगितले आहे. मात्र, हीच बाब थिएटर चालकांसाठी अडचणीची ठरणार आहे. येणाऱया प्रत्येक व्यक्तीचा मोबाईल क्रमांक घेणे हे तांत्रिकदृष्टय़ा कठीण आहे. त्याच्यासाठी अधिक मनुष्यबळ लागणार आहे. शिवाय प्रेक्षक आपला खरा मोबाईल नंबर देतील याची खात्री नाही, असे बेळगाव जिल्हा थिएटर संघटनेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. सध्या बेळगावमध्ये काही थिएटर चालकांनी आपली थिएटर सुरू केली आहेत. त्यांना प्रेक्षकवर्ग मिळावा अशी अपेक्षाही पोतदार यांनी व्यक्त केली. तथापि, थिएटर पूर्णतः चालण्यासाठी उत्तमोत्तम बिगबजेट नवीन पिक्चर येणे आवश्यक आहे. असे चित्रपट येतील तेव्हाच प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल, असेही अविनाश पोतदार यांनी स्पष्ट केले. मात्र, परिस्थिती पूर्वीपेक्षा बऱयापैकी नियंत्रणात आली असून, 100 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली ही बाब अत्यंत स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.









