कचरा उचल्याकडे कर्मचाऱयांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी/ सातारा
शहरातील अनेक भागातून रोज कचरा गोळा करणाऱया घंटागाडय़ा विनाअच्छादन हा कचरा सोनगाव कचरा डेपोमध्ये टाकतात. प्रवासादरम्यान हा घंटागाडय़ातील कचरा बोगदा-सोनगाव डेपोच्या रस्त्यावर पडत आहे. यामुळे कचऱयाचे ढिग वाढत आहेत. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहर स्वच्छ ठेवण्यावर भर दिला गेला. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पुन्हा शहरात कचऱयांचे साम्राज्य वाढलेले दिसत आहे. हा कचरा उचलण्यासाठी नियमित घंटागाडय़ा प्रभागात फिरत आहे. कचरा गोळा करून सोनगाव डेपोत हा कचरा नेताना झाकून न्यावयाचा असतो. मात्र कचऱयाने गाडी भरल्यानंतर जादा खेपा व्हाव्यात यासाठी घंटागाडी चालक-मालक कचऱयावर कोणतेही अच्छादन न घालता ती गाडी तशीच बोगद्याकडे नेतात. बोगदा ओलांडल्यानंतर तर आपल्या गाडीत कचरा आहे. याचा विसरच या गाडीवाल्यांना पडतो. आणि बेफाम वेगाने या घंटागाडय़ा सोनगाव कचरा डेपोकडे धावू लागतात. प्रवासादरम्यान हा कचरा अस्थाव्यस्थ होवून बोगदा-सोनगाव डेपो रस्त्यावर पडत आहे.
रोज सकाळी मॉर्निग वॉक करण्यासाठी तसेच या परिसरात असणाऱया कुरणेश्वर येथे देवदर्शनासाठी साताऱयातील प्रतिष्ठीत सुजाण नागरिक येत असतात. त्यांना या कचऱयांच्या दुर्गंधीमुळे त्रास होतो. जकातवाडी, शहापूर आदी गावांकडून येणारे प्रवासीही या कचऱयामुळे त्रस्त झाले आहेत. त्यांनी कित्येक वेळा या घंटागाडी चालकांना याबाबत समज दिलेली आहे. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने घंटागाडी चालक-मालक यांचा मनमानी कारभार वाढलेला आहे.
कोरोनाची धास्ती झाली कमी…
शहरात कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवली होती. यामुळे शहरातील 90 टक्के कचऱयाचे प्रमाण कमी झाले होते. तोच कोरोना बाधितांची संख्या मंदावल्याने प्रशासनाने वाढत्या कचऱयाच्या साम्राज्याकडे दुर्लक्ष केले आहे. यांचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. इतर भागाच्या तुलनेत वर्दळ असणाऱया भागात विक्रेत्यांकडून नियम मोडण्यात येत आहेत.
स्वच्छ सातारा रहिला नावापुर्ता
शहरात प्रशासनाकडून स्वच्छतेचे धडे नेहमीच दिले जातात. मात्र वाढत्या कचऱयांच्या साम्राज्याकडे दुर्लक्ष केले जाते. यात बोगदा-सोनगाव कचरा डेपो मार्गावर आता कचऱयांचा ढिग वाढल्याने स्वच्छ सातारा नावापुर्ता राहिला आहे. हा कचरा कधी उचला जाणार असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे.








