व्हीएचएफ प्रणालीचा वापर बंद : बीएसएनएल कार्यालयातील टॉवर ठरला होता कुचकामी
प्रतिनिधी /बेळगाव
शहराचे प्रतिबिंब म्हणून ओळखला जाणारा सर्वात उंच बीएसएनएल कार्यालयातील टॉवर अखेर नामशेष झाला आहे. 1970 मध्ये उभारण्यात आलेला 100 मीटर उंचीच्या टॉवरचा वापर टेलिफोन सिग्नलसाठी केला जात होता. मात्र, मोबाईल क्रांतीमुळे या टॉवरचे महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे सर्वात उंच असलेला हा टॉवर बीएसएनएल कंपनीने हटविला आहे.
यापूर्वी टेलिफोन तसेच वायरलेस सुविधेसाठी टॉवरची आवश्यकता होती. त्यामुळे टेलिफोन खात्याने 1970 मध्ये 100 मीटर उंचीचा टॉवर बीएसएनएल कार्यालय आवारात उभारला होता. त्यावेळी व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) करिता या टॉवरचा वापर केला जात असे. बेळगाव, धारवाड आणि कोल्हापूर आदी शहरांसाठी टेलिफोन संपर्काकरिता टॉवरवरील यंत्रणेचा वापर करण्यात येत होता. मात्र, टेलिफोनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याने मोबाईल क्रांती झाली. याकरिता ओएफसी (ऑप्टिकल फायबर केबल) चा वापर करण्यात आला. त्यामुळे एका शहरापासून दुसऱया शहराला जोडण्यासाठी ओएफसीचे जाळे घालण्यात आले. ठिकठिकाणी टॉवरची उभारणी करण्यात आली. त्यामुळेच व्हीएचएफ प्रणालीचा वापर पूर्णपणे बंद झाला. परिणामी बीएसएनएल कार्यालयात उभारण्यात आलेला 100 मीटर उंचीचा टॉवर कुचकामी बनला होता.
मोबाईल-ओएफसी केबलमुळे व्हीएचएफ प्रणाली पूर्णपणे बंद
बेळगाव ते हणमनहट्टी-दोडवाड आणि धारवाड तसेच बेळगाव ते उक्कड-चिकोडी आणि कोल्हापूर अशा मार्गे व्हीएचएफ प्रणालीद्वारे सिग्नल जात होते. त्याद्वारे टेलिफोनसाठी यंत्रणेचा वापर केला जात होता. पण मोबाईल आणि ओएफसी केबलमुळे व्हीएचएफ प्रणाली पूर्णपणे बंद झाली. 40 ते 60 मीटरच्या टॉवरद्वारे मोबाईल नेटवर्क पसरते. मोबाईल नेटवर्कसाठी 100 मीटर टॉवरची गरज भासत नाही. तसेच या टॉवरच्या देखभालीसाठी वर्षाला 7 ते 8 लाखाचा खर्च करावा लागत होता. त्यामुळे सर्वात उंच म्हणून ओळखला जाणारा बीएसएनएल कार्यालयातील टेलिफोन टॉवर हटविण्यात आला आहे. हा टॉवर शहराची ओळख म्हणून परिचित होता. टॉवर हटविण्याचे काम तीन महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले होते. पेनच्या साहाय्याने हा टॉवर हटविण्यात आल्याने आता तो नामशेष झाला आहे.









