पाणी नसल्याने बंद अवस्थेत
प्रतिनिधी / बेळगाव
नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शहरात विविध ठिकाणी पाणपोई उभारण्यात आल्या होत्या. पण देखभाली अभावी पाणपोईचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. सध्या शुद्ध पाण्याची मागणी असल्याने स्मार्ट सिटीत आरओ प्लॅंटची उभारणी करण्यात आली. पण हे प्लँट देखील काही महिन्यातच बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे मुश्किल बनले आहे.
शहरात पाणी टंचाईची समस्या उद्भवत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. विशेषता बाजारपेठेत येणाऱया नागरिकांना आणि व्यापारी वर्गाला पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तेड द्यावे लागते. त्यामुळे पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराच्या विविध भागात आरओ प्लॅंट उभारण्यात आले आहेत. मात्र पाण्या अभावि हे आरओ प्लॅंट बंद अवस्थेत आहेत. सध्या विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने पिण्याचे पाणी मुबलक मिळत नाही. नागरिक पिण्याचे पाणी पाण्यासाठी आरओप्लँटचा आधार घेत आहे. पण आरओ प्लॅंटमध्ये देखील पाणी नसल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत लाखो रूपये खर्चून धर्मवीर संभाजी चौक, नरगुंदकर भावे चौक, श्रीनगर गार्डन, न्यायालय आवार, गोवावेस, वडगाव बालोद्यान अशा विविध ठिकाणी आरओ प्लॅंटची उभारणी करण्यात आली आहे. पण पाणी टंचाईच्या काळातच पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. प्लॅंटची देखरेख करण्याची जबाबदारी स्मार्ट सिटी कंपनीच्या कंत्राटदाराचे आहे. पण प्लॅंट उभारणी केलेल्या काही महिन्यातच बंद पडू लागल्याने भवितव्य काय? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.









