नूतन शहर पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकरांची ग्वाही
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची बदली सांगली येथे झाली. यानंतर नवे कारभारी कोण यांची प्रतिक्षा होती. ती आता संपली असून शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी सोलापूरही बदली होवून आलेले भगवान निंबाळकर यांची वर्णी लागली आहे. त्यांनी शुकवारपासून पदभार स्वीकारला आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांची सोलापूर ग्रामीण वरून शहर पोलीस ठाणे येथे बदली झाली आहे. त्यांनी सोलापूर ग्रामीण येथे अनेक तडीपारीच्या कारवाया केल्या आहेत. तसेच साताऱयाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शहरातील सुरक्षितेच्या दृष्टीने पावले उचलणार असल्याचे सांगितले. तसेच गुंडांच्या मुसक्या आवळणार असून गुन्हेगारीला आळा बसवणार आहे.
यांच्यासह सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कदम यांची वडूज पोलीस ठाण्यात विनंतीवरून बदली करण्यात आली आहे. तसेच मानवी संसाधन (पोलीस कल्याण) पोलीस निरीक्षक नवनाथ कोंडीबा मदने यांची शिरवळ पोलीस ठाणे, कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळू रसिक भरणे यांची वाई पोलीस ठाणे येथे बदली झाली आहे. वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांची कराड तालुका पोलीस ठाणे, नियंत्रण कक्ष पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांची महाबळेश्वर पोलीस ठाणे येथे बदली झाली आहे. तसेच वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश बोडखे हे गतवर्षी 13 डिसेंबर 2020 पासून दिर्घकाळ आजारपणामुळे अनुपस्थित होते. त्यांची वडूज पोलीस ठाण्यावरून नियत्रंण कक्ष अशी प्रशासकीय करणास्तव बदली करण्यात आली आहे.
‘तरुण भारत’ चा अचूक अंदाज
सातारा शहर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या बदलीचे वृत्त ‘तरुण भारत’ने दि. 30 जुलैच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्याचवेळी शहरचा कार्यभार सोलापूरहून बदली झालेले भगवान निंबाळकर यांच्याकडेच जाणार असेही स्पष्ट केले होते. शुक्रवारी मांजरे यांनी आपल्या पदाचा कार्यभार निंबाळकर यांच्याकडे सोपवल्यामुळे ‘तरुण भारत’चा अंदाज पुन्हा एकदा अचूक ठरला आहे.









