जागा उपलब्ध नसल्याने प्रस्ताव धूळ खात, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
शहराचा विस्तार दिवसागणिक वाढत असल्यामुळे शहराच्या उत्तर भागात अग्निशमन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव अग्निशमन विभागाने मांडला होता. जागा उपलब्ध करून देण्यासाठी मनपा व केआयडीबीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु प्रस्ताव पाठवून अडीज वर्षे उलटली तरी अद्याप जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
2018 मध्ये ऑटोनगर येथे एका गोदामाला मोठी आग लागली होती. आग मोठय़ा प्रमाणात लागल्याने धारवाड येथुन अग्निशमन बंब मागवावे लागले होते. यानंतर शहराच्या उत्तर भागातही अग्निशमन केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. गोवावेस येथून शहराच्या उत्तर भागात पोहोचेपर्यंत उशिर होत असल्याने अनेकवेळा मालमत्तेचे नुकसान होत आहे. शहरात वाढलेले ट्रफिक व सिग्नलवर लागलेल्या वेळेमुळे आग लागलेल्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होत आहे. शहराचा विस्तार वाढत असल्याने उत्तर भागात एक सुसज्ज असे अग्निशमन केंद्र सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात होती.
तात्पुरते सुरू करण्यात आलेले केंद्रही बंद
रेल्वे ओव्हरब्रिजचे काम सुरू असल्याने मध्यंतरी तात्पुरच्या स्वरूपात एस. पी ऑफिस शेजारी एक अग्निशमन बंब ठेवण्यात आला होता. यामुळे उत्तर भागात आग लागण्याची घटना घडताच तो बंब घटनास्थळी पोहोचत होता. परंतु त्या ठिकाणी जवानांसाठी कोणतीच व्यवस्था नव्हती. ना शौचालयाची व्यवस्था, ना अग्निशमन वाहनामध्ये पाणी भरण्याची व्यवस्था यामुळे काही महिन्यातच हे केंद्र बंद करावे लागले होते.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
ऑटोनगर, काकती, होनगा, कंग्राळी परिसरात औद्योगिक वसाहत वसविण्यात आली आहे. एखादी दुर्घटना घडल्यास गोवावेस येथून 3 ते 4 सिग्नल पार करत वाहनाला घटनास्थळी पोहचावे लागते. त्यामुळे उत्तर भागात एक अग्निशमन केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे. परंतु जागा मिळत नसल्याची कारणे दाखवत टोलावीटोलवी करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे हा प्रस्ताव रखडत चालला आहे.
व्ही. एस. टक्केकर
शहराच्या उत्तर भागात अग्निशमन केंद्र सुरू करण्यासाठी अग्निशमन विभागाने मनपा, केआयडीबीकडे प्रस्ताव पाठविला होता. परंतु अद्याप याबाबत कोणत्याच विभागाने जागा उपलब्ध करून देण्यासाठी सहमती दर्शविलेली नाही. शहराची व्याप्ती वाढत असून उत्तर भागात वेळेत पोहोचणे बऱयाचवेळी शक्मय होत नाही. त्यामुळे हे केंद्र लवकर सुरू करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
– अग्निशमन अधिकारी









