शहरवासियांसमोर पाणीटंचाईची समस्या
प्रतिनिधी /बेळगाव
हिडकल योजनेंतर्गत असणाऱया पंपहाऊसमध्ये आणि हिंडलगा पंपहाऊसमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने शहराचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने पाणी ओसरण्यास प्रारंभ झाला आहे. पण दुरुस्तीचे काम पूर्ण करून बुधवार दि. 28 पासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती एलऍण्डटीच्या पाणीपुरवठा विभागाकडून उपलब्ध झाली आहे.
गेल्या चार दिवसात पावसाचा जोर वाढल्याने जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले होते. राकसकोप जलाशय तुडूंब भरल्याने अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीत सोडण्यात आले आहे. परिणामी मार्कंडेय नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीकाठावरील सर्व शेती पाण्याखाली गेली. नदीचे पाणी हिंडलगा येथील पंपहाऊसमध्ये शिरले आहे. त्याचप्रमाणे हिडकल पाणीपुरवठा योजनेतील तुम्मरगुद्दी, कुंदरगी पंपहाऊसमध्ये पाणी शिरले आहे.
त्यामुळे शहरातील जलशुद्धीकरण केंद्राला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी शहराचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शहरवासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरातील कूपनलिका आणि विहिरींचा पाणीपुरवठा विविध भागात केला जात आहे. काही भागात विहिरी आणि कूपनलिका नसल्याने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाणी समस्या निर्माण झाली आहे. शहराचा पाणीपुरवठा कधीपासून सुरळीत होणार? याची माहिती एल ऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱयांना विचारली असता बुधवार दि. 28 पासून पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सध्या पाण्याची पातळी ओसरण्यास प्रारंभ झाला असून विविध दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. पंपहाऊसमध्ये पाणी शिरल्याने विविध उपकरणांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.









