नव्या अध्यक्ष नियुक्तीच्या प्रक्रियेला पुढील आठवडय़ात प्रारंभ शक्य, इम्रान ख्वाजा काळजीवाहू अध्यक्ष
दुबई / वृत्तसंस्था
शशांक मनोहर यांनी आयसीसी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून यामुळे आयसीसीमधील पहिल्या स्वतंत्र अध्यक्षपदाच्या त्यांच्या पर्वाची खऱया अर्थाने बुधवारी सांगता झाली. शशांक मनोहर यांनी नोव्हेंबर 2015 मध्ये ही धुरा स्वीकारली होती.
‘शशांक मनोहर यांनी दोन वर्षांच्या दुहेरी टर्मनंतर अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. आयसीसी कार्यकारिणीची आज बैठक झाली आणि त्यात उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा यांच्याकडे पुढील अध्यक्ष नियुक्तीपर्यंत तात्पुरता पदभार सोपवण्याचे निश्चित केले गेले. इम्रान ख्वाजा आता काळजीवाहू अध्यक्ष या नात्याने जबाबदारी सांभाळतील’, असे आयसीसीने एका पत्रकातून नमूद केले.

आयसीसीच्या नियमाप्रमाणे, कोणत्याही अध्यक्षाला तीन वेळा दोन वर्षांच्या कालावधीकरिता अध्यक्षपदी विराजमान होता येते. शशांक मनोहर यापूर्वी दोन वेळा प्रत्येकी दोन वर्षांकरिता अध्यक्ष राहिले. त्यामुळे, त्यांना आणखी एकदा दोन वर्षांकरिता अध्यक्षपदी कायम राहता आले असते. पण, त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. व्यवसायाने वकील असणाऱया 62 वर्षीय मनोहर यांनी 2008 ते 2011 या कालावधीत बीसीसीआयचे अध्यक्षपदही सांभाळले आहे.
दरम्यान, आयसीसीचा नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया पुढील आठवडय़ात सुरु होऊ शकेल, असे संकेत आहेत. आयसीसीचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी मनू साहनी यांनी शशांक मनोहर यांचे नेतृत्व व एकंदरीत योगदानाबद्दल आभार मानले. शशांक मनोहर आयसीसीला अत्यंत उत्तम वळणावर आणण्यात यशस्वी झाले आहेत, असे काळजीवाहू अध्यक्ष उस्मान ख्वाजा यांनी प्रतिपादन केले.
‘शशांक मनोहर यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली, त्यावेळी आयसीसीची जी स्थिती होती, ती सुधारुन आयसीसीला आणखी शिखरावर पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे’, असे ख्वाजा याप्रसंगी म्हणाले.









