कलाकारांना जसं त्यांच्या भूमिकेविषयी, अभिनयाविषयी कौतुकाचे शब्द ऐकायला मिळत असतात तसच जर पडद्यावरची ती भूमिका जर खलनायकाची असेल तर प्रेक्षकांच्या शिव्याही ऐकायला मिळतात. कौतुक आणि राग या दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया स्वीकारण्यासाठी कलाकार मंडळी तयारच असतात. इतकच नव्हे तर जेव्हा मालिका भरकटतात तेव्हा प्रेक्षकांच्या नाराजीची सुई अनेकदा कलाकारांकडेच वळते. त्यात सोशलमीडियावर ट्रोल करणाया कमेंटचा मारा तर वेगळाच. पण जेव्हा हे सगळं असहय् होतं तेव्हा कलाकारांचाही संयम सुटतो आणि मग चुकीच्या प्रवृत्तीच्या प्रेक्षकांना प्रत्युत्तर देण्यासाठी त्याच सोशलमीडियाचा वापर करतात. सध्या अभिनेता शशांक केतकर याच कारणाने भडकला असून जसा बाहेर उन्हाचा पारा चढलाय तसाच शशांकच्या रागाचाही पारा चढला आहे. काम आवडलं नाही तर थेट सांगा, पण गलिच्छ भाषा वापरून आम्हाला ट्रोल केलं तर त्याचे उत्तर त्याच गलिच्छ भाषेत आम्ही कलाकारही देऊ शकतो असं म्हणत शशांकने त्याचा राग व्यक्त केला आहे. शशांकची ही पोस्ट सध्या नेटवर्तुळात चांगलीच व्हायरल होत असून ट्रोलिंग, कलाकार आणि त्यातून होणारी शाब्दीक बाचाबाची या विषयाची खपली पुन्हा एकदा निघाली आहे.
यापूर्वी होणार सून मी या घरची, इथेच टाका तंबू आणि सुखाच्या सरींनी हे मन बावरे या तीन मालिकांमध्ये सोज्वळ, समंजस नायक या भूमिकेत लोकप्रिय ठरलेल्या अभिनेता शशांक केतकर याने हीच चौकट मोडत खलनायक साकारण्याचा निर्णय घेतला. सध्या शशांक पाहिले न मी तुला या मालिकेत समरप्रताप जहागीरदार ही खलनायकाची भूमिका करत आहे. नायक आणि नायिकेच्या प्रेमात खो घालणाया व्हिलनच्या रूपात शशांकने केलेला अभिनय त्याच्या चाहत्यांना खूपच आवडत असल्याच्या प्रतिक्रिया त्याला सोशलमीडियावरून मिळत आहेत. शशांकही या भूमिकेसाठी खूप उत्सुक होता. आता मला शिव्या खाव्या लागणार अशी कॅप्शन लिहित शशांकने त्याच्या नव्या भूमिकेविषयीची उत्सुकताही सोशलमीडियावर व्यक्त केली होती.
नुकताच या मालिकेत रंगपंचमीचा ट्रक शूट झाला. त्याचे प्रोमोही झळकले. त्या प्रोमोमध्ये नायिकेला रंग लावून तो नायकापासून तिला लांब नेत असल्याचा सीन आहे. हा प्रोमो शशांकने त्याच्या इन्स्टा पेजवर शेअर केला. त्यावर कमेंट आणि रिप्लाय असा संवाद सुरू असतानाच एका ट्रोलरने लिहिलं की, आम्हाला तर असं कळलं की तुझ्या पार्श्वभागावर डांबर टाकलं. यावरूच हा वाद चिघळत गेला. सुरूवातीला शशांकने कलाकारांचा, त्यांच्या कामाचा आदर करा असे सौम्य भाषेत उत्तर दिले. पण तो ट्रोलर जेव्हा अश्लील आणि गलिच्छ भाषेत बोलायला लागता तसा मात्र शशांक भडकला. प्रेक्षकांना मालिका आवडली नाही, एखाद्या कलाकाराचे काम आवडले नाही तर त्यांनी ते जरूर सांगावे. शिवाय पडदयावरचं कॅरेक्टर रंगवणारे आम्ही कलाकार फक्त चेहरे असतो, आमच्यामागे 15 जणांची टीम काम करत असते. ही भट्टी जर जुळली नाही तर नक्कीच प्रयत्न फेल होतात. नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार प्रेक्षकांना नक्कीच आहे, पण त्यासाठी जाहीर संवादामध्ये ढुंगण यासारखे असभ्य शब्द वापरणाया ट्रोलरने मालिका तयार करावी आणि त्यात अभिनय करून डांबर लावलेला फोटो शेअर करावा इथपर्यंत शशांकने त्याला सुनावलं.
गेल्या काही दिवसांपासून नेटकरी ट्रोलर्समुळे कलाकार मेटाकुटीला आले आहेत. शशांकच्या पोस्टवर आलेल्या गलिच्छ भाषेतील कमेंटमुळे पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला आहे. शशांक केतकर हा नेहमीच समाजातील चुकीच्या गोष्टींवर त्याच्या सोशलमीडियावर ताशेरे ओढत असतो. ट्रोलर्सनाही त्याने आजपर्यंत अनेकदा चोख उत्तर दिले आहे. मन बावरे ही मालिका बंद करा अशा आशयाच्या कमेंट जेव्हा शशांकच्या इन्स्टापेजवर आल्या होत्या तेव्हाही शशांकने उत्तर देताना असं म्हटलं होतं की मालिका बंद करा हे म्हणणं खूप सोपं आहे. पण त्या मालिकेमुळे अनेकांचं घर चालत असतं. जर मालिकेत काही खटकत असेल तर नक्की सांगा, ती बंद करा हे म्हणणं योग्य नाही. तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्या कंपनीमालकाला कंपनी बंद करा असं सांगितलं तर ते तुम्हाला चालेल का असा सवाल करत शशांकने विनाकारण काहीही बोलणायांची बोलती बंद केली होती. आता असभ्य भाषेत कमेंट करणाया ट्रोलर्सना उत्तर देत कलाकारांचा आदर करा असा दमही शशांकने भरला आहे.









