ओडिशातील ग्रामस्थांचे अजब कृत्य
ओडिशाच्या नयागढमधून एक अशी घटना समोर आली आहे, ज्यातून आजही समाजाचे काही घटक कशाप्रकारे अंधश्रद्धेच्या बेडय़ांमध्ये अडकले आहेत हे दिसून येते. येथील एका गावातील लोकांनी मृत व्यक्तीला मंत्र-तंत्रांनी जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मृताचे पोस्टमॉर्टम देखील झाले होते.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या आधुनिक युगात ही हैराण करणारी घटना नयागढ जिल्हय़ातील सारांकुल पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱया बारासाही गावात घडली आहे. राबी नाहक असे मृताचे नाव होते.
45 वर्षीय नाहक यांनी एक स्थानिक नृत्य ‘डांडा नाचा’मध्ये भाग घेतला होता. याच्याशी संबंधित परंपरेनुसार नाहक यांनी 36 तासांपर्यंत काहीच खाल्ले नव्हते. दोन दिवसांपूवीं नाहक आजारी पडल्यावर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते, जेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयाच्या नियमांनुसार रविवारी शवविच्छेदन करण्यात आल्यावर मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात आला होता. त्यानंतर मृतदेह गावी आणला गेला होता.
पण गावात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी ग्रामस्थांनी एका भोंदू बाबाला पाचारण केले. त्याने मंत्रोच्चारासह मृताच्या आत्म्याला साद घालण्याचा कथित प्रकार चालविला होता. ग्रामस्थ आणि नाहक यांच्या कुटुंबीयांनी त्याच्यावरील विश्वासापोटी प्रार्थनाही सुरू केली. पण या प्रक्रियेत त्यांच्या इच्छेनुसार यश मिळाल्याने अखेर सोमवारी संध्याकाळी ग्रामस्थांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत. नाहक यांचा मृत्यू डिहायड्रेशनमुळे झाला होता असे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे.