दुरुस्तीकडे दुर्लक्ष : अभियंत्यांच्या विरोधात लोकायुक्तांकडे तक्रार करण्याचा विचार
प्रतिनिधी /बेळगाव
सदाशिवनगर स्मशानभूमीत बसविण्यात आलेली डिझेलवर चालणारी शवदाहिनी अद्याप बंदच आहे. गॅसवर चालणाऱया शवदाहिनीमध्ये परिवर्तन करण्यासाठी 80 लाखांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. मात्र महापालिका आयुक्तांनी हा प्रस्ताव फेटाळल्याने बासनात पडला आहे. सदर शवदाहिनीच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
शहरवासियांच्या सुविधेसाठी सदाशिवनगर स्मशानभूमीत डिझेलवर चालणारी शवदाहिनी बसविण्यात आली होती. याकरिता 65 लाखांचा निधी खर्च करण्यात आला होता. मात्र माहिती हक्क कायद्यांतर्गत विचारणा केली असता 45 लाखांचा निधी डिझेल शवदाहिनीसाठी खर्च करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली होती. या शवदाहिनी बसवून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करून दोन वर्षे उलटली. पण आतापर्यंत केवळ एकच अंत्यविधी करण्यात आला आहे. एका अंत्यविधीसाठी तब्बल 6 तासांचा वेळ लागला. तर 60 लीटर इंधन लागले. त्यामुळे अंत्यविधीसाठी लागणारा वेळ आणि खर्च पाहता ही शवदाहिनी वापराविना धूळखात पडली आहे.
शवदाहिनीचा उपयोग नागरिकांना व्हावा, यादृष्टीने गॅसवर चालणाऱया शवदाहिनीमध्ये रुपांतर करण्यात यावे, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती. गोंधळी गल्ली येथील कार्यकर्त्यांनी याबाबतचे निवेदन देऊन महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे शवदाहिनीचे परिवर्तन करण्याची सूचना साहाय्यक कार्यकारी अभियंते सचिन कांबळे यांना केली होती. तसेच या शवदाहिनीच्या परिवर्तनासाठी येणाऱया खर्चाचे अंदाजपत्रक मागविण्याची सूचना केली होती. आयुक्तांच्या सूचनेनुसार दोन कंत्राटदारांकडून अंदाजपत्रक घेण्यात आले होते. बेंगळूर येथील एका कंत्राटदाराने परिवर्तनासाठी जीएसटीसह 80 लाख रुपये खर्च असल्याचे अंदाजपत्रक सादर केले होते. सदर शवदाहिनी बसविण्यासाठी 65 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर दुरुस्तीसाठी 80 लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात आल्याने महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी हा प्रस्ताव फेटाळला. तज्ञ कंत्राटदारांना बोलावून अंदाजपत्रक घ्यावे, अशी सूचना केली.
आठ दिवसांत कारवाई करावी
तसेच परिवर्तनासाठी निविदा मागविण्याचा आदेश साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना बजावला होता. मात्र याबाबत अभियंत्यांनी कोणतीच कारवाई केली नाही. सदर अंदाजपत्रक आयुक्तांनी फेटाळल्याने अभियंत्यांनी शवदाहिनीच्या परिवर्तनाकडे दुर्लक्ष केले आहे. मर्जीतील कंत्राटदाराला आयुक्तांनी नाकारल्याने अभियंत्यांनी शवदाहिनीच्या परिवर्तनासाठी निविदा काढण्याकडे कानाडोळा केला आहे. येत्या आठ दिवसांत याबाबत कारवाई सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
डिझेल शवदाहिनीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा संशय
यापूर्वी निर्माण केलेल्या डिझेल शवदाहिनीचे काम व्यवस्थित झाले नसल्याने याचा वापर होत नाही. अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळेच ही शवदाहिनी धूळखात पडली आहे. या शवदाहिनीच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय बळावला असून याबाबत लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









