आजारांवरील अजब उपचारपद्धत
औषधे किंवा वनौषधींद्वारे आजारांवर उपचार करताना डॉक्टरांना पाहिले असते. पण शरीरावर आग लावून आजारांवर उपचार करताना कधी पाहिले आहे का? चीनमध्ये काहीसा असाच प्रकार घडतो. ही एक अशी विद्या आहे, जी मागील 100 वर्षांपेक्षा अधिक काळापासून चीनमध्ये वापरली जात आहे. याला ‘फायर थेरपी’ म्हणून ओळखले जाते.
चीनमध्ये अनेक आजारांवरील उपचारासाठी फायर थेरपी अवलंबिण्यात येते. या प्रक्रियेद्वारे लोकांवर उपचार करणारे ‘झांग फेंगाओ’ अत्यंत लोकप्रिय आहेत. चीनमध्ये काही लोक फायर थेरपीला विशेष प्रकारचे उपचार मानतात, ज्याद्वारे तणाव, नैराश्य, पोटदुखी आणि वंध्यत्वापासून कर्करोगापर्यंतचे उपचार शक्य असल्याचे मानले जाते. उपचाराची ही पद्धत चीनच्या प्राचीन मान्यतांवर आधारित आहे. ज्यानुसार शरीरात उष्णता आणि थंडी यांच्यात संतुलन राखण्यावर भर देण्यात आला आहे.
प्रथम रुग्णाच्या पाठीवर वनौषधींनी तयार एक लेप लावला जातो आणि मग टॉवेलद्वारे तो भाग आच्छादिला जातो. त्यावर पाणी आणि अल्कोहाल शिंपडले जाते आणि रुग्णाच्या शरीरावर आग लावली जाते. फायर थेरपीबद्दल अनेक प्रश्न देखील उपस्थित होतात. उपचार करणाऱयाकडे संबंधित प्रमाणपत्र आहे का नाही?, उपचारादरम्यान दुर्घटनेपासून वाचण्यासाठी कुठल्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था आहे असे प्रश्न उपस्थित होतात.
अनेकदा लोकांना ईजा झाली आहे, तर काही रुग्णांचे चेहरे आणि शरीराचे अन्य भाग काही प्रमाणात जळाले आहेत. पण हे प्रकार योग्य पद्धतींचा अवलंब न केल्याने घडले आहेत. मी हजारो लोकांना फायर थेरपी शिकविली असून आतापर्यंत कुठलीच दुर्घटना झाली नसल्याचा दावा झांग फेंगाओ यांनी केला आहे.
फायर थेरपीने चिनी आणि पाश्चिमात्य उपचारपद्धतींना मागे टाकले आहे. तीव्र आजारांच्या उपचारात मोठी रक्कम खर्च करणे प्रत्येकाला शक्य नाही, अशा स्थितीत फायर थेरपी त्याच्यासाठी उपयुक्त आणि स्वस्त उपचारपद्धत असल्याचे झांग म्हणाले.